कर्जत बसस्थानकावर मोकाट जनावरांचा धुडगूस

नगरपंचायतीकडे अद्याप कोंडवाडाच नाही ः वाहतूक नियंत्रकांचेही होत आहे दुर्लक्ष
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत बसस्थानकावर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या वावराने प्रवासी, तसेच शालेय विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. बसस्थानकात महामंडळाच्या एसटी बसऐवजी मोकाट जनावरांचा वावर अधिक आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, या प्रश्नाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विविध भागांतून येणाऱ्या प्रवाशांकडून यावर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

कर्जतला बसस्थानकातील सुविधा तसेच एसटी डेपो या प्रश्नांवर वेळोवेळी आंदोलने झाली. मात्र प्रश्न सुटले नाहीत. मोकाट जनावरांमुळे महिला तसेच विद्यार्थिनींना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. मोकाट जनावरांच्या अडथळ्यामुळे रस्ता अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे. नगरपंचायतीकडून मोकाट जनावरांच्या नियंत्रणासाठी ठोस अंमलबजावणी केल्याचे दिसत नाही. मोठ्या जनावरांबरोबरच परिसरात डुकरांचा सुळसुळाट झालेला आहे. एसटी बसपेक्षा खासगी वाहनांचा कर्जत बसस्थानकात वावर अधिक आहे. महामंडळाच्या नाकावर टिच्चून बसस्थानकातच खासगी वाहनांत प्रवासी बसवून त्यांची वाहतूक केली जात आहे.

नव्याने बांधलेल्या बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरल्याने तेथे प्रवासी थांबत नाहीत. घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीमुळे प्रवासी बसस्थानकासमोरील झाडाखाली बसणे पसंत करतात. तेथे मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे जमा होतात. यात लहान मुले तसेच वयोवृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रश्‍न तत्काळ सोडविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

नगरपंचायतीने रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करावा. बसस्थानकावरील अनेक प्रश्नांमुळे बाहेरगावच्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मुलींना जनावरांबरोबरच टारगट मुलांचाही त्रास होत आहे. बसस्थानकावर होमगार्ड नेमलेले आहेत. मात्र येथे पोलीस कर्मचाऱ्यांनीही हजर राहणे गरजेचे आहे.
सुदाम धांडे ,युवा नेते, धांडेवाडी

मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा तयार करण्यासंदर्भात मागे ठराव घेण्यात आला होता. पण पुढील कार्यवाही झाली नाही. पंधरा दिवसांत नगरपंचायती जवळील जागेत तात्पुरत्या स्वरूपाचा कोंडवाडा तयार केला केला जाईल.
प्रतिभा भैलुमे नगराध्यक्षा, कर्जत

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)