अजित पवार समर्थकांची संकलित होतेय माहिती
पुणे – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मध्ये महा विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू असतानाच; राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी बंड करत थेट भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीने अजित पवारांना एकटे पाडण्याची खेळी सुरू केल्यानंतर त्यांच्या मागे नक्की किती आणि कोणते नगरसेवक आहेत, यासंबंधीची माहिती गोळा करण्याचे काम गुप्तचर विभागाकडून सुरू करण्यात आल्याचे रविवारी पुण्यात समोर आले.
राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना गुप्तचर विभागाकडून तुम्ही कोणत्या पवारांसोबत आहात आणि सध्या कुठे आहात, अशी विचारणा करण्यात येत आहे. त्यामुळे अडचण झालेल्या नगरसेवकांकडून सावध पवित्रा घेत आपण पक्षासोबत असल्याचे सांगत, वेळ मारून नेण्यात आली आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा निर्णय वैयक्तिक असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगत गटनेते पदावरून अजित पवार यांची उचलबांगडी करण्याचा ठरावही राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत करण्यात आला. तसेच पत्र राज्यपालांना देण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून अजित पवार यांच्या मागे राष्ट्रवादीची किती ताकद उभी राहणार, याचा शोध घेण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. त्यासाठी गुप्तचर विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यासाठी गुप्तचर अधिकारी आणि कर्मचारी पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. या नगरसेवकांना तुम्ही कोणासमवेत असणार आहात, आत्ता सध्या कोठे आहात, अशा पद्धतीची माहिती विचारली जात आहे. यासंबंधीची माहिती राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांकडून देण्यात आली आहे. तसेच हा अहवाल थेट भाजप श्रेष्ठींना दिला जात असल्याच्याही चर्चा आहे.