पाथर्डी – मोहटादेवी यात्रेनिमित्त राज्यभरातून आलेल्या विविध कलाकारांच्या हजेरींनी व नामवंत मल्लांच्या कुस्त्यांच्या हंगाम्याने मोहटादेवी यात्रेची सांगता झाली. राज्यातील नामवंत कालाकारांनी देवीच्या दारात अदाकारी सादर करुन हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केले. तर दुपारी पैलवानांच्या कुस्त्याच्या हंगाम्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त देवस्थानची यात्रा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त बुधवारी संध्याकाळी मोहटादेवीच्या पालखीची मिरवणूक मोहटे गावातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. देवस्थान समितीचे विश्वस्त राजेंद्र भंडारी व रामदास पालवे यांच्या हस्ते देवीची महापूजा करून पालखी मोहटादेवी गडाच्या दिशेने मार्गस्थ केली.गावामंध्ये पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.
पहाटे साडेचारच्या सुमारास पालखी गडावर पोहचली. पालखी गडावर पोहचताच फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर पहाटेची आरती विश्वस्त अरुण दहिफळे यांच्या हस्ते करण्यात आली. गुरुवारी सकाळी हंगाम्यांच्या ठिकाणी राज्यभरातून आलेल्या विविध कलाकारांनी हजेऱ्या सादर केल्या. स्वाती व अंजना लोकनाट्य तमाशा मंडळ, हरिभाऊ बडे व शिवकन्या बडे तमाशा मंडळ, शाहीर संभाजीराव जाधव तमाशा मंडळ यासह कलगीतुरा ,गोंधळी गीते , गौळण, संबळ वाद्य वाजवणारे, भजनगायक, नकलाकार, विनोदी कलाकार यांनी यात्रेत हजेरी लावली.
तमाशा कलावंत शिवकन्या बडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यावर गायलेल्या गीतावर भाविकांनी चांगलीच दाद दिली. तमाशा कलावंताच्या कला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे चार तास चाललेल्या कार्यक्रमात फडातील सर्व कलाकारांनी रसिकांची मने जिंकली. देवस्थान समितीतर्फ सर्व कलावंतांना प्रसाद स्वरूपात बिदागी देण्यात आली. लोककलाकारांचे कुलदैवत म्हणून देवीची उपासना त्यांचेकडून होते. यात्रेदरम्यान अन्य कलाकारांची ओळख होउन जिल्हानिहाय दौरे कसे असतील याची माहिती परस्परांना यात्रेत दिली जाते. तर दुपारी राज्यभरातून आलेल्या नामवंत पहिलवानांनी सहभाग नोंदवत भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
यावेळी देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाच्या योग्य नियोजनामुळे हंगामा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी देवस्थान समितीचे विश्वस्त राजेंद्र भंडारी,भास्करराव सांगळे, अरुण दहिफळे, रामदास पालवे, राजेंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, सहायक भिमराव खाडे तसेच पंच कमिटीतील अविनाश फुंदे, अमृत चोपडा, हनुमान दहिफळे, महादेव दहिफळे, रवी दहिफळे,बाबासाहेब दहिफळे, रामदास दहिफळे,भगवान दहिफळे, संदीप पालवे, यांच्यासह आदी पंचांनी उत्कृष्ट कामगिरी करत हंगामा यशस्वीपणे पार पडला. हजारो रसिकांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला