राजमाची किल्ला परिसरात बिबट्याचा वावर

संग्रहित छायाचित्र...

नागरिक भयभीत : युवकाच्या धाडसामुळे वासराचा वाचला जीव

लोणावळा – राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या उधेवादी गावात एका बिबट्याने वासरावर हल्ला चढवला. त्या वासराला खेचत झाडावर घेऊन गेला. मात्र अक्षय वाघमारे या युवकाने वेळीच दाखवलेल्या धाडसामुळे या वासराचा जीव तर वाचलाच पण अगदी गावाजवळ रस्त्याच्या बाजूला झाडावर बसलेला बिबट्याने देखील धूम ठोकली.

गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास उधेवादी गावात मारुती मंदिराच्या समोरच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ हा प्रकार घडला. याठिकाणी एका पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याने गावात फिरत असलेल्या गायीच्या वासरावर हल्ला केला. जवळच असलेल्या झाडावर या वासराला खेचत नेले. त्याचवेळी तेथून जवळच राहणारा अक्षय वाघमारे हा युवक घरातून बाहेर पडला. त्यावेळी त्याला समोरचा प्रकार दिसला. त्याने धाडस दाखवीत हातामधील बॅटरीचा प्रकाशझोत बिबट्यावर टाकून मोठमोठ्याने ओरडून बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. यामुळे सैरभैर झालेल्या बिबट्याने तोंडात पकडलेल्या वासराला तसाच झाडावर लटकलेल्या अवस्थेत सोडून झाडावरून उडी मारून पोबारा केला.

दरम्यान अक्षय याच्या आवाजामुळे जमा झालेल्या ग्रामस्थांनी झाडावर अर्धमेल्या अवस्थेत लटकलेल्या वासराला खाली घेत त्याचा जीव वाचवला. राजमाचीच्या घनदाट जंगलात बिबट्या वाघाचा रहिवास आहे. राजमाचीकर ग्रामस्थांना तसेच येथे ट्रेकिंगसाठी येणाऱ्या ट्रेकर्सना अधूनमधून बिबट्याचे दर्शनही होत राहते. मात्र मागील काही दिवसांपासून या वाघांचा वावर किल्ला परिसरात आणि किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गावाच्या आजूबाजूला वाढला आहे.

जंगलात चरायला गेलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला करून ठार त्यांना मारल्याच्या घटना येथे अधूनमधून घडत असतात. मात्र गावात शिरून एखाद्या पाळीव जनावरावर या बिबट्याचा हल्ला होणे ही ग्रामस्थांसाठी धोक्‍याची घंटा ठरत आहे. याशिवाय राजमाची किल्ल्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या ट्रेकर्सची संख्या देखील अअसल्याने वनविभागाने वेळीच अशा घटनांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)