वडिलांच्या निधनानंतरही संघाबरोबर राहण्याचा निर्धार
सिडनी/मुंबई – ही बातमी वाचून तुमचे डोळे पाणावले, तर तुमच्यामधला माणूस अजून जिवंत असल्याचा तो साक्षात्कार असेल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असा, तुमच्या कर्तव्याच्या आड तुमच्या भाव-भावना येऊ देऊ नका, असे अनेक नामांकित लोक सांगताना आपण नेहमी ऐकत असतो. त्याची अंमलबजावणी आपण किती करतो, हे एक प्रश्नचिन्ह असले, तरी काही अपवदात्मक उदाहरणांमधून, अनेक कलाकार, नेते, चित्रकार अशा भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या नात्याने, “शो मस्ट गो ऑन…’ म्हणत, व्यक्तिगत जीवनातले दु:ख बाजूला ठेवून काम करत राहताना दिसतात.
अगदी तसाच प्रत्यय सध्या ऑस्ट्रेलियामध्ये गेलेल्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने दिला असून, समस्त भारतीय क्रिकेटप्रेमींचं मन त्यानं जिंकलं आहे. आपले रिक्षाचालक असलेले वडील प्रदीर्घ आजाराने निधन पावल्याची बातमी मोहम्मद सिराजला शनिवारी समजली.
माझे बाबा नेहमी म्हणायचे की, माझा मुलगा देशाचं नाव मोठं करेल. आता मी बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक कठोर मेहनत घेईन. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबांनी रिक्षा चालवत अनेक कष्ट केले आहेत. माझ्यासाठी ही खरंच धक्कादायक गोष्ट होती. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार मी गमावला. मला देशाकडून खेळताना पाहणं हे त्यांचं स्वप्न होतं.
– मोहम्मद सिराज, वेगवान गोलंदाज
परदेशात असताना असा दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना वडीलांचे अंतिम संस्कार आणि कुटुंबियांना आधार देता यावा, म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सिराजला भारतात परतण्याची परवानगी दिली. मात्र, देशाचे प्रतिनिधित्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याची संधी मिळालेल्या सिराजने संघाबारोबर ऑस्ट्रेलियातच राहण्याचा आपला निर्णय जाहीर केल्याने, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
शुक्रवारी सिडनीमध्ये मोहम्मद सिराज सराव करत होता. सराव करुन सिराज परतल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य कोच रवी शास्त्री यांनी सिराजला त्याचे वडिल मोहम्मद घौस यांच्या निधनाची बातमी दिली. त्याचबरोबर बीसीसीआयनं सिराजच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोकसंदेशही प्रसारीत केला. बीसीसीआयकडून शनिवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं असून यामध्ये त्यांनी सिराजला वडिलांच्या निधनानंतर मायदेशी परतण्याची परवानगी दिल्याचं सांगितलं.
आपल्या वडिलांच्या निधनाच्या दुःखावर मात करण्यासाठी मोहम्मद सिराजला बळ मिळो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा जबरदस्त व्यक्तिमत्व. कठीण प्रसंगातही देशहिताला प्राधान्य देणाऱ्या सिराजचे कौतुक वाटतेय.
– सौरव गांगुली, बीसीसीआय अध्यक्ष
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वडिलांच्या निधनामुळे मायदेशात परतण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु राष्ट्रीय कर्तव्यासाठी ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय त्याने घेतला आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी दिली. फुप्फुसांच्या आजारामुळे सिराजच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले. याबाबत बीसीसीआयने त्याच्याशी चर्चा केली. त्याच्यासमोर भारतात परतण्याचा पर्याय ठेवण्यात आला. मात्र त्याने भारतीय संघासमवेत राहण्याचा निर्णय स्पष्ट केला, असे शाह यांनी सांगितले.
वडिलांनी रिक्षा चालवून सिराजचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न साकारले. मागील रणजी हंगामात हैदराबादकडून 41 विकेट्स घेतल्यामुळे तो प्रकाशझोतात आला. नंतर सिराजला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बेंगळुरूच्या संघाकडून संधी मिळाली. तेराव्या हंगामात सिराजने आरसीबीकडून खेळताना आश्वासक मारा केला होता. सिराजची चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.