अहमदाबाद – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कुटुंबियांसह दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अहमादाबादच्या मोटेरा या स्टेडियम मध्ये नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान मोदी आणि ट्रम्प यांनी भाषणातून एकमेकांचं भरभरुन कौतुक केलं.
काय म्हणाले ट्रम्प-
आज ज्याप्रमाणे मोदींच्या भारतात आमचं स्वागत झालं. ते आम्ही कधीच विसरु शकत नाही. त्यामुळे मोदींचे आम्हाला विशेष कौतुक वाटतं. त्यांनी त्यांच्या प्रवासाची सुरुवात चहावाला म्हणून केली आणि आज ते पंतप्रधान आहे. त्यांचा हा प्रवास फार सोपा नव्हता. इथपर्यंत पोहचणे फार कठीण आहे. हा खरंतर भारतीय लोकशाहीचा चमत्कार आहे, असं म्हणत ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं.
काय म्हणाले मोदी-
मी माझ्या अमेरिकेच्या दौऱ्याची सुरुवात हाऊडी मोदी या कार्यक्रमातून केली होती. आणि आज माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमातून करत आहेत. अमेरिका ते भारत एवढ्या मोठ्या प्रवासानंतर ते थेट या कार्यक्रमात आले. तुमच्या स्वागतासाठी संपुर्ण भारत सज्ज झालं आहे. तुमचं कुटुंबासोबत भारतात येणं म्हणजे भारत अमेरिकेचं कौटुंबिक नातं असल्याचं प्रतिक ठरलं आहे, असं मोदी म्हणाले. त्यांच्या सोबतच मोदींनी ट्रम्प यांच्या मुलीचंही कौतुक केलं.