नवी दिल्ली: “हाऊडी मोदी’ कार्यक्रमात ज्याप्रमाणे डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा आदराने उल्लेख केला होता, त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला तिरस्कार बाजूला ठेवून डेमोक्रॅटिक नेत्यांप्रमाणेच मत मांडले असते, तर बरे झाले असते, असे कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे.
“हाऊडी मोदी’ कार्यक्रमाच्यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते स्टेनी होयर यांनी पंतप्रधान मोदींचे मंचावर स्वागत केले आणि आपल्या भाषणात महात्मा गांधी आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा आदराने उल्लेख केला होता. होयर यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी समाधान व्यक्त केले. “ज्याप्रमाणे अपण मार्टिन ल्युथर किंग यांना आदर देतो, त्याचप्रमाणे अमेरिकेतील नेतेही महात्मा गांधी आणि नेहरूंना आदरच देतात. देशाच्या राष्ट्रीय चळवळीतील नेहरू हे अग्रगण्य नेते आणि आधुनिक भारताचे शिल्पकार होते. त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. नेहरू आणि महात्मा गांधींच्या योगदानाबाबत मोदींना आठवण करून दिली गेली, हे अधिक चांगले झाले.’ असे शर्मा म्हणाले.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही याबाबत आनंद व्यक्त केला. काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्कमधील भाषणादरम्यान लालकृष्ण आडवाणींनीही नेहरूंची स्तुती केली होती. वाजपेयी यांनी “जाने कहां गये वो दिन…’ अशा शब्दात नेहरूंबाबत आदर व्यक्त केला आहे, असे रमेश म्हणाले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक सिंघवी यांनीही होयर यांच्या वक्तव्यावरून मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आणि “मोदीजींच्या बाबतीत हे अगदीच अनपेक्षित होते.’ असे ते म्हणाले.