शिख आणि काश्‍मिरी प्रतिनिधींनी घेतली मोदींनी भेट

ह्युस्टन: “हौडी मोदी’ या कार्यक्रमासाठी ह्युस्टन येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेत स्थायिक झलेल्या शीख समुदायाच्या आणि काश्‍मिरी प्रतिनिधींची भेट घेतली. या समुदायांनी मोदींचे उत्साहात स्वागत केले आणि त्यांचाकडून आपल्या अपेक्षांचे निवेदनही सादर केले.

वेगवेगळ्या सुरक्षा एजन्सींनी केलेल्या आढावा नंतर भारत सरकारने गेल्या आठवड्यात भारतविरोधी कार्यात सामील असलेल्या 312 शीख विदेशी नागरिकांची नावे काळ्या यादीतून काढली होती. त्याबद्दल या शीख समुदायाच्या प्रतिनिधींनी मोदींना धन्यवाद दिले. शीख समाजातील सदस्यांनी मोदींना पारंपारिक सिरोपाही भेट दिला.

गुरु नानक देव जी यांची 500 वी जयंती साजरी होत असताना अमेरिकेमध्ये राहणारे शीख मोठ्या संख्येत भारतात जाणार आहेत. त्यामुळे या शीखांना व्हिसा आणि पासपोर्ट सेवा देण्याची विनंती या प्रतिनिधींनी पंतप्रधानांना केली.
पंतप्रधानांना भेटण्यासाठी काश्‍मिरींचे प्रतिनिधीमंडळही आले होते. काश्‍मीरला नवसंजीवनी दिली जाईल, असे मोदींनी या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. या प्रतिनिधी मंडळामध्ये 17 काश्‍मिरी पंडीतांचा समावेश होता.

“काश्‍मीरमध्ये नवीन वारे वाहू लागले आहेत. आपण सगळे जण एका नवीन काश्‍मीरचे निर्माण करू जे सर्वांसाठी खुले असेल.’ असे मोदी यांनी या प्रतिनिधींना सांगितले. काश्‍मिरी पंडीतांनी 30 वर्षे संयम दाखवल्याबद्दल मोदींनी त्यांना धन्यवाद दिले. तत्पूर्वी, काश्‍मिरी पंडितांनी भारताच्या प्रगतीसाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांचे समर्थन व्यक्त केले, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट केले.

दाऊदी बोहरा समुदायाच्या सदस्यांनीही मोदी यांची भेट घेतली. या संवादादरम्यान दाऊदी बोहरा समुदायातील सदस्यांनी सैयदना साहिब यांच्यासोबतचे सहचर्य अधोरेखित केले. मोदींनी मागीलवर्षी इंदोर येथे त्यांच्या समुदायाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, याची देखील आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

बलुच आणि पश्‍तो गटाकडूनही मोदींकडे मदतीची याचना
पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळविण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी सिंधू, बलोच आणि पश्‍तो गटांचे प्रतिनिधी ह्युस्टनमध्ये एनआरजी स्टेडियमसमोर निदर्शने करण्यासाठी जमले होते. शनिवारी बालोची अमेरिकन, सिंधी अमेरिकन आणि पश्‍तो अमेरिकन समुदायांचे अनेक सदस्य अमेरिकेच्या विविध भागांमधून अमेरिकेच्या विविध भागांमधून शनिवारी ह्युस्टनला दाखल झाले आणि तेथे त्यांनी पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अमेरिका आणि भारताकडे मागणी केली. पाकिस्तान त्यांच्या समाजात मानवी हक्कांचे घोर उल्लंघन करीत आहे, असा आरोप या गटांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.