सिंधुदुर्गातील नेत्यासाठी नाणारचा खटाटोप

खासदार विनायक राऊत : नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीका
रत्नागिरी:  विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा नाणार प्रकल्पावरुन भाजप-शिवसेनेत वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या रिफानरी प्रकल्पाला केलेल्या समर्थनानंतर आता याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटू लागले आहेत. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेना प्रकल्पग्रस्तांसोबत मैदानात उतरली आहे. नाणार जवळील तारळ गावात प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली. नाणार प्रकल्प सिंधुदुर्गातील एका नेत्यासाठी आणला जात आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला.

नाणार प्रकल्पाचा निषेध खासदार विनायक राऊत यांनी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. हा प्रकल्प हा सिंधुदुर्गातील एका नेत्यासाठी आणला जात आहे. या नेत्याच्या 300 एकर जमिनीचे तीन हजार कोटी रुपये या प्रकल्पामुळे अडकले आहेत. त्यामुळे या सर्व खटाटोप सुरु असल्याचे विनायक राऊत म्हणाले. या प्रकल्पाच्या समर्थकांना लोकसभेत मिळालेल्या 298 मतांवरून त्यांची लायकी काय आहे हे मुख्यमंत्र्यांनी तपासावे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

कोकणात महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या नाणार प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली. नाणार प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा चर्चा केली जाईल असे सांगत मुख्यमंत्र्यांकडून या प्रकल्पाचे समर्थन केले गेले. या विधानामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेल्याचे पाहायला मिळत आहे. या विधानाचे राजकीय पडसाद नाणार पंचक्रोशीत उमटत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)