मोदींमुळे साखरेला 31 रुपये हमीभाव : बिपीन कोल्हे

कोपरगाव  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पश्‍चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू केली. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी पाटपाण्यासाठी दिलेल्या संघर्ष लढ्याला यश आले असून साखर उद्योगाला अडचणींच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल दरात केलेली वाढ आणि साखरेला 31 रूपये प्रतिकिलो हमीभाव दिला हे आजवरच्या इतिहासात नोंद घेण्यासारखे असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले. सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यावेळी ते बोलत होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजुर करण्यात आले.

या हंगामात रामदास बोठे (आडसाली 101 टन), राजेंद्र गवळी (पुर्वहंगामी 84 टन), विश्वासराव महाले (सुरू 44 टन), रामदास वाघ (खोडवा 60 टन) या विक्रमी उस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याबरोबरच दहेगांव बोलका येथील हर्षवर्धन वल्टे यांची भारतीय सैन्य दलात कॅप्टन म्हणून निवड झाल्याबद्दल, कृषिभूषण अशोक भाकरे यांचा बिपीन कोल्हे, शंकरराव कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, बाजार समितीचे सभापती संभाजीराव रक्ताटे, ज्येष्ठ माजी संचालक प्रभाकर बोरावके, त्र्यंबकराव सरोदे, नितीन औताडे आदी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, साखर धंदा अडचणीत आहे. यावर्षी उसाचा तुटवडा आहे. मागील हंगामात 9 कोटी 50 लाख मे. टन उसाचे गाळप होवुन त्यापासुन विक्रमी साखरेचे उत्पादन झाले. साखरेचे भाव खाली कोसळल्याबरोबर केंद्र शासनाने त्यात हस्तक्षेप केला. समन्यायीच्या नावाखाली नगर नाशिककरांच्या पाण्याला टाच आणू नये. आम्ही सर्व शेतकरी अगोदरच पाणीप्रश्नांवर भरडले गेलो आहोत. ज्या विरोधकांनी समन्यायी पाणी वाटपाचा कायदा केला तेच आता आमच्याकडुन पाण्याचा हिशोब मागत आहेत हे चुकीचे आहे.

काहींना आता आमदारकीचे डोहाळे लागले. गावोगाव फलक लावून जाहिरातबाजी सुरू आहे पण जनमत व जनरेटा काम करणाऱ्यांच्याच मागे उभा रहात असतो. कोपरगाव शहर व तालुक्‍यात आलेल्या प्रत्येक संकटात सर्वप्रथम संजीवनी उद्योग समुहच धावून आलेला आहे. दहा वर्षात आमदारकी असतांना काही करता आले नाही, उलट आम्ही आणलेल्या 321 कोटी रूपयांच्या विकास निधीची कामे विरोधकांना खुपत आहे. आ.कोल्हे म्हणाल्या, विरोधकांनी कितीही टिका केली तरी खचणारी नसुन लढणारी आहे, मतदारांचे पाठबळ आपल्या पाठीशी मोठे आहे, लोकसभेच्या निवडणुकीत मोदी शासन सत्तेवर आले आता राज्यातही पुन्हा भाजप शिवसेना युतीचेच सरकार सत्तेवर येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सुत्रसंचलन व आभार संचालक शिवाजीराव वक्ते यांनी मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.