जिल्ह्यात पुन्हा स्वाईन फ्लूचा धोका?

पुणे – शहरात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कडक उन्हामुळे मागील 8 दिवसांपासून स्वाईन फ्लूचा एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. अतिदक्षता विभागातील रुग्णांची संख्याही कमी झाली; परंतु पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. दमट हवामानामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्‍यता आहे.

ऑगस्ट महिन्यातील पावसामुळे शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांनी थैमान घातले आहे. दिवसाआड दोन ते तीन रुण स्वाईन फ्लूचे आढळून येत होते. त्यामुळे अतिदक्षता विभाग आणि वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक वाढली. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाने उघडीप दिली आणि उन्हाचा चटका वाढला. त्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादूर्भावही कमी झाली. गेल्या 27 ऑगस्टपासून नवीन एकही स्वाईन फ्लूचा रूग्ण आढळून आला नाही; परंतु मागील 24 तासांत पावसाला सुरुवात झाल्यामुळे वातावरणात बदल झाला. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, रात्री हवेत गारवा असल्यामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे.

बुधवारी (दि. 4) दिवसभरात साडेचार हजार व्यक्‍तींची स्वाईन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 113 संशयित व्यक्‍ती आढळून आले असून, त्यांना “टॅमीफ्लू’ देऊन घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. तर सद्यस्थितीत 2 रुग्णांवर अतिदक्षता विभागात; तर एकावर वॉर्डमध्ये उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

संसर्ग टाळा…
नागरिकांनी घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रूमाल बांधूनच घराबाहेर पडावे. घसा खवखव करणे, दुखणे आणि सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी घराबाहेर पडू नये. तसेच, घर आणि परिसरात पावसाच्या साठलेल्या पाण्याला मोकळी जागा करून द्यावी. दमट वातावरण असल्यावर विशेष काळजी घ्यावी. शिवाय, परिसरात अस्वच्छता होणार नाही, याची काळजी घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.