विक्रम लॅंडरचा शोध घेण्यात नासाचा ऑर्बिटरही अपयशी

न्युयॉर्क : चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात आलेल्या विक्रम लॅंडरचा शोध घेण्याची शेवटची आशा आता धुसर झाली आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या नासाच्या ऑर्बिटरला देखिल विक्रम लॅंडरचा शोध लागलेला नाही. विक्रम लॅंडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरला ते ठिकाण नासाच्या ऑर्बिटरच्या क्षेत्रात नसल्याने ऑर्बिटरने काढलेल्या फोटोंमध्ये लॅंडर दिसत नसल्याची प्राथमिक शक्‍यता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था “नासा’ने व्यक्त केली आहे.

चंद्राच्या अभ्यासासाठी नासाकडून पाठविण्यात आलेले ऑर्बिटर सध्या चंद्राभोवती फिरत आहे. मंगळवारी हे ऑर्बिटर ज्या ठिकाणी विक्रम लॅंडर उतरणार होते. त्या ठिकाणाहून पुढे सरकत होते. या संदर्भात नासाच्या प्रवक्ते जोशुआ हंडाल म्हणाले, विक्रम लॅंडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरणार होते. तेथील काही फोटो नासाच्या ऑर्बिटरने घेतले आहेत. पण विक्रम लॅंडर नक्की कुठे आहे, याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे ऑर्बिटरच्या माध्यमातून नेमका फोटो घेता येणार नाही.

सात सप्टेंबर रोजी विक्रम लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. पण लॅंडिंगच्या काही वेळ आधी विक्रम लॅंडरचा बंगळुरूमधील इस्रोच्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लॅंडरचे नक्की काय झाले, याबद्दल विविध तर्क लावण्यात येत आहेत. विक्रम लॅंडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आता या संपर्कासाठी खूप कमी वेळ शिल्लक राहिला आहे.

इस्रोच्या नियोजित वेळापत्रकानुसार विक्रम लॅंडर केवळ 14 दिवस काम करणार होते. म्हणजे 21 सप्टेंबरनंतर विक्रम लॅंडरचा संशोधनासाठी काहीच उपयोग होणार नाही. विक्रम लॅंडर उतरलेल्या भागामध्ये लवकरच रात्र सुरु होणार आहे. त्यावेळी येथील तापमान उणे 180 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जाते. विक्रम लॅंडरने चंद्रावर दिवस असताना सर्व संशोधन करणे अपेक्षित होते. मात्र, संपर्क तुटल्याने विक्रम लॅंडरच्या माध्यमातून कोणतेच संशोधन करण्यात इस्रोला अद्याप यश आले नाही. त्यामुळेच चंद्रावरील या भागात रात्र झाल्यानंतर पुन्हा दिवस होईपर्यंत विक्रम लॅंडर निष्क्रिय होण्याची शक्‍यता जास्त असून त्यानंतर पुन्हा त्याच्याशी कधीच संपर्क होऊ शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)