कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे आवाहन
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजप नथुराम गोडसेला देशभक्त मानतात की महात्मा गांधींचा मारेकरी हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. ग्वाल्हेर येथे माध्यमांशी ते बोलत होते. भाजपचे नेते महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संकल्प यात्रा काढत आहेत. पण त्यांनी हे सांगावे की नथुराम हा देशभक्त होता किंवा नाही. भाजपची विचारधारा ही गांधींच्या अगदी विरुद्ध आहे त्यामुळे सुरूवातीला भाजपने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली.
1970 -71 मध्ये संघाचे कुशाभाऊ ठाकरे आणि राजमाता विजयाराजे शिंदे यांनी मला जनसंघात सहभागी होण्यास सांगितले होते. पण मी गेलो नाही. कारण मी गांधींना मानतो असे दिग्विजय सिंह यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नथुराम गोडसेबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी 2019 मध्ये भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह उभ्या होत्या. दोघांमध्ये रोमांचक लढत झाली होतीय प्रज्ञा ठाकूर यांनी नथुराम गोडसे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. नथुराम गोडसे हे सच्चे देशभक्त होते आणि कायम राहतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते.