मुळशीत दहशत माजवणाऱ्या दोन टोळ्यांवर पौड पोलिसांची कारवाई
पिरंगुट – मुळशी तालुक्यात दहशत माजविणाऱ्या दोन टोळ्यांमधील 16 अट्टल गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली, अशी माहिती पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.
याबाबत पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी सांगितले की, जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आर्थिक आणि गुन्हेगारी वर्चस्वासाठी रिहे खोऱ्यात दहशत माजवणाऱ्या आकाश बाळू पडळघरे, स्वप्नील काळुराम पडळघरे, अक्षय रोहिदास पडळघरे, नवनाथ बाळू भोईने, समीर अशोक शिंदे, श्रीकांत लक्ष्मण पडळघरे, दत्ता किसन शिंदे, विकास बाळू मालपोटे ज्ञानेश्वर ऊर्फ माउली एकनाथ पडळघरे या नऊ जणांवर कारवाई करण्यात आली.
जानेवारी महिन्यात पडळघरवाडीजवळ या आरोपींनी फिर्यादी विशाल बाळू मोरे व मंगेश नामदेव पालवे, बाळासाहेब लक्ष्मण शिंदे, सागर शांताराम कांबळे व आसिफ मुनीर मुलाणी यांच्या चारचाकीला पिकअप गाडी आडवी लावून अडवले. मागून ट्रॅक्टरने गाडीला धडक दिली. हातात लोखंडी कोयते घेऊन या गाडीवर दगडफेक केली, गाडीच्या डाव्या बाजूची काच फोडून मंगेश पालवे याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर लोखंडी कोयत्याने वार केले. तीन व्यकींना जबरदस्तीने गाडीत बसवून लवळे येथे नेऊन धमकावून, हाणामारी करून त्यांच्याजवळील 15 हजार काढून घेणाऱ्या दुसऱ्या टोळीतील टोळी प्रमुख शुभम संभाजी गोळे, नितेश रामेश्वर भारती, विजय मानसिंग ठाकुर, संकेत युवराज सोनवणे, हर्षद गोळे, हरीदास शेडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पिरंगुटमधील कोको कोला कंपनीच्या गेटसमोर शिवम सुदाम शिंदे, अमरकांत श्विपुजन यादव व जुगानी पलटन कहार यांना अनोळखी तिघांनी अडवून 12 मार्चला गुप्तीचा धाक दाखवत शुभम गोळे याच्या सांगण्यावरून जबरदस्तीने गाडीत बसवून लवळे गावाकडे जाणाऱ्या टीआरडब्ल्यू कंपनीच्या शेजारील मोकळ्या जागेत नेले. तेथे आधीच 5 ते 6 जणहोते. एकूण 8-9 जणांनी त्या तिघांना जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने 15 हजार रुपयांची खंडणी मागितली. तिघांजवळील दोन मोबाइल व रोख रक्कम असा एकूण 41 हजारांचा माल जबरदस्तीने काढून घेतला. याबद्दल ट्रक ड्रायव्हर शंकर शिवाजी लवटे, (रा. बराटेवस्ती, मोशी) यांनी पौड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
वरील दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी तीन पोलीस तपास पथके तयार करून आरोपींचा शोध घेतला आणि गुन्ह्यातील आरोपी नितेश रामेश्वर भारती, विजय मानसिंग ठाकुर, संकेत युवराज सोनवणे यांना पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवालदार अब्दुल शेख, पोलीस नाईक जय पवार, पोलीस शिपाई अक्षय नलावडे, गणेश साळुंखे, शेखर हगवणे, सुनील कदम यांच्या तपास पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. यांच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीत वेगवेगळ्या स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.
यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे पौड पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ. सुहास वारके, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्याकडे दोन्ही गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रस्ताव दाखल केले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी या प्रस्तावानुसार दोन्ही गुन्ह्यातील एकुण 16 आरोपींविरुध्द् मोकांतर्गत कारवाई करण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे-पाटील या करीत आहेत.