पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.7) मतदान होत आहे. सोमवारी सकाळी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंघनिहाय पोलीस बंदोबस्तात साहित्याचे वितरण करण्यात आले. सर्व मतदान केंद्रांवर अधिकारी-कर्मचारी सोमवारी सायंकाळपर्यंत पोहचले
बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यानुसार मतदान साहित्याचे वाटप सोमवारी झाले. केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात आले.
क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक यांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन सहायक निवडणूक अधिकारी यांनी केले. त्यानंतर हे सर्व कर्मचारी -अधिकारी बसेसने संबंधित मतदान केंद्राकडे निघाले. मतदान केंद्रांवर कर्मचारी पोहचल्यानंतर त्याची माहिती झोनल अधिकारी यांना कळविण्यात आली.
या प्रमाणे मतदान यंत्रांचे वितरण
विधानसभा – मतदान केंद्र – बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट – व्हीव्हीपॅट
दौंड – 309 -927 -309 -309
इंदापूर – 330 – 1,188 – 330 -330
बारामती – 380 -1,140 -380 -380
पुरंदर – 421 -1,263 -421 -421
भोर – 561 – 1,683 -561 -561
खडकवासला – 465 -1,395 -465 -465
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी पथकांना साहित्य वितरण केले आहे. बसेस, जीपद्वारे आज सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी आपापल्या केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत पोहचले. पोलीस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था आदीच्या अनुषंगानेही सर्व व्यवस्था झाली आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे.
कविता द्विवेदी , निवडणुक निर्णय अधिकारी
१,२७८ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग
यापूर्वी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी यंदा प्रथमच पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यानुसार बारामती मतदारसंघातील 1 हजार 278 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची व्हिडिओ कॅमेरा सुविधा असेल. त्यांची लिंक स्थानिक पोलीस स्टेशनसह जिल्हा नियंत्रण कक्ष आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला उपलब्ध असेल. त्याद्वारे मतदान केंद्रांवर थेट वॉच आणि बोगस मतदानाला आळा बसण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तीन मतदान केंद्र संवेदनशील
पार्श्वभूमी पाहता, काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढलेली, दुबार मतदान, मतदान केंद्रावर फेरफार, गोंधळ, भांडणे किंवा वारंवार एकाच मतदान केंद्रावरील इलेक्ट्रॉनिक व्होटर मशीनमध्ये (ईव्हीएम) बिघाड होणे, एकाच मतदान केंद्रावर 75 टक्के मतदान झाले असेल आणि एकाच उमेदवाराला 95 टक्के मते मिळाली असेल, दुबार मतदारांची संख्या, गर्दीच्या ठिकाणी असणारे मतदान केंद्र, आदी बाबींचा विचार संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात येतात. त्यानुसार बारामती मतदारसंघात तीन मतदान केंद्र ही संवेदनशील म्हणून घोषित केली आहे.
बिघाड झाल्यास 30 मिनिटांत नवे ईव्हीएम
प्रत्येक 10 ते 12 मतदान केंद्रांमागे एका झोनल अधिकारी असेल. हे अधिकारी मतदान केंद्रांची पाहणी करतील. काही समस्या निर्माण झाल्या, तर झोनल अधिकारी याबाबत निर्णय घेतील. त्यांच्यासोबत अतिरिक्त कर्मचारी आणि राखीव मतदान यंत्रे असतील. एखाद्या मतदान केंद्रावरील यंत्रामध्ये बिघाड झाल्यास 30 मिनिटांत नवीन मशीन उपलब्ध केले जाणार आहे.
साडेचार हजार फुट उंचीवरील रायरेश्वर मतदान केंद्र
जिल्ह्यातील सर्वांत उंच अशा 4 हजार 505 फुट उंचीवरील रायरेश्वर येथे मतदान केंद्र आहे. तेथे १६० मतदारांसाठी केंद्रस्थापना करण्यात आली आहे. भोरपासून ३० कि.मी. असलेल्या मतदान केंद्राकडे रायरेश्वरच्या पायथ्यापर्यंत वाहनाने जाता येते. रायरीमार्गे रायरेश्वराच्या पायथ्यापर्यंत १८ किलोमीटर प्रवास करावा लागतो. त्यानंतर एक तास पायी जाऊन लोखंडी शिडीच्या सहाय्याने मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येते.
या मतदान केंद्रासाठी सर्वांत आधी साहित्य वाटप करण्यात आले. तेथील अडचण लक्षात घेता, निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेल्या बॅगपॅकचे वितरण कर्मचाऱ्यांना करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी हे अंतर पूर्ण करून मतदान केंद्रावर साहित्य पोहोचविले, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.