मुंबई – राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.
हा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान व्यापार संघटनांनी या निर्णयाला विरोध केला असून हा निर्णय दुकान मालकांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पहिली प्रतिक्रिया देताना ”कुंभकर्णची झोप मोडली, त्याबद्दल अभिनंदन’ असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे. मनसेकडून पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे
”कुंभकर्णची झोप मोडली, त्याबद्दल अभिनंदन” ते पुढे म्हणाले,’निवडणुकीच्या तोंडावर निर्णय झाला याचा अर्थ शिवसेनेच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच त्यांना आता मराठी आठवली आहे.’ असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे.