चंडिगढ – उत्तरप्रदेशात आमदार असणाऱ्या पत्नीने कॉंग्रेस सोडल्याने त्या पक्षाच्या पंजाबमधील आमदाराचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशातील राजकीय घडामोडीचा इफेक्ट पंजाबमध्ये पाहावयास मिळाला आहे.
पंजाबमधील नवांशहरचे आमदार अंगद सैनी यांनी सोमवारी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. पत्नी भाजपमध्ये गेल्याने आपले तिकीट कापण्यात आले. कॉंग्रेस नेतृत्वाने मला पत्नीविरोधात निवेदन जारी करण्यास सांगितले होते. मात्र, मी नकार दिला. त्यामुळे मला तिकीट नाकारण्यात आले, असा आरोप सैनी यांनी केला.
पंजाबमध्ये यावेळी कुठल्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर माझ्या भूमिकेलाही मोठे महत्व प्राप्त होईल, असा दावाही त्यांनी केला. सैनी यांच्या पत्नी आदिती सिंह उत्तरप्रदेशातील रायबरेलीच्या आमदार आहेत. मागील निवडणुकीत (2017) त्या कॉंग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या. मात्र, अलिकडेच त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला.
आदिती यांनी रायबरेलीतून लढण्याचे आव्हान थेट कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिले. ती कृती साहजिकच कॉंग्रेसला रूचलेली नाही. त्यामुळे आदिती यांच्याशी संबंधित घडामोडींचा राजकीय फटका सैनी यांना बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.