प्रा. डी. के. वैद्य
अकोले – डफ… ताशा वाजायला लागतो… अन् आमदार देहभान विसरतात व चक्क नाचायला लागतात. नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. किरण लहामटे सध्या आपल्या आगळ्या वेगळ्या नृत्यामुळे चर्चेत आले आहेत. कधी मतदारांबरोबर सेल्फी काढतात, तर कधी ते सार्वजनिक ठिकाणी नृत्य करून वादही ओढवून घेतात. आपण आता लोक, जनता, समाज यांच्या नेतृत्वाचे कॅप्टन आहोत, याचा विसर पडणारा डॉ. लहामटे यांचा हा अविष्कार म्हणूनच त्यांना वादात खेचणारा ठरत आहे.
अकोले विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या बोहड्यातील व बालआनंद मेळाव्यातील ‘नृत्याविष्कार’ दर्शवणारी व्हिडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. तिने सर्वच अचंबित झाले नाही, तर नवल ते काय? राज्यात आदिवासी भागात बोहाडा (संगीत आखाडी) नावाने मुखवट्यांचा किंवा सोंगाचा (स्वांगांचा) उत्सव होतो. विशेषतः ठाणे, नगर व नाशिक जिल्ह्यात साधारण हा उत्सव आयोजित करण्यात येतो. तीन, पाच, किंवा सात दिवस चालणाऱ्या या उत्सवास आखाडा’ किंवा आखाडी’ असेही नाव आहे. अकोले तालुक्यात सध्या शिक्षक विभागाचे बालमेळाव्यांची धूम सुरू आहे. या सर्व ठिकाणी केंद्रस्थानी आहेत, ते आ. डॉ. लहामटे.
निवडणूक झाल्यापासून सत्कार, उद्घाटन भेटी गाठीत ‘आमदार साहेब’ मग्न आहेत. तर काल… परवा झालेल्या एका बालआनंद मेळाव्यात? (बोहाडा?) कार्यक्रमात तर चक्क हातात तलवार घेऊन बेभान झालेल्या आमदार साहेबांचे नृत्य जनतेने पाहिले… आणि ती व्हिडिओ क्लीप सध्या जोरदार चर्चेत आली आहे.
आमदार साहेब जरा थांबा आता..! कार्यकर्त्यांचा उत्साह आपण समजू शकतो. पण साहेब 40 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. जनतेच्या अपेक्षांचा भला मोठा डोंगर आपल्या समोर उभा आहे. 40 वर्षे ज्यांनी अकोले तालुक्यात अधिराज्य केले, ते पिचड पिता व पुत्र आपल्या समोर विरोधीपक्ष म्हणून उभे आहेत. अनेक समस्यांनी मतदारसंघ घेरला आहे. पिंपरकणे उड्डाण पूल, निळवंडे कालवे, तोलारखिंड, घाटघर-चोंढे-शहापूर रस्ता, बिताका प्रकल्प, आढळा उंची वाढ, एमआयडीसी, आरोग्य, वीज व अन्य असंख्य प्रश्न आ वासून पुढे उभे आहेत.
आपण मतदरांना सांगितले आहे की जे 40 वर्षांत झाले नाही ते आपण करून दाखवणार आहे. मग वाट कुणाची पहात आहात साहेब? आपण नृत्य कामाला सुरवात तर केली आहे. पण मतदारांना कामाचा धडाका पाहिजे (त्यांना अपेक्षा पूर्तीसाठी नाचायला लावू नका). नृत्य नको, याचे भान ठेवून आपण आपल्या वाटचालीला प्रारंभ करा, हीच या मातीची, इथल्या माणसांची व इथल्या विरोधी पक्षांची अपेक्षा असणे गैर नाही.