MLA Disqualification Case – शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या (MLA Disqualification Case) दीड तास झालेल्या आजच्या युक्तिवादावेळी व्हिपच्या मुद्द्यावरून ठाकरे (Thackeray Group) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला.
आमदारांना जारी करण्यात आलेला व्हिप हा ई मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर तो व्हिप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हिपचे उल्लंघन केले नसल्याचे शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाची कागदपत्रे ही 16 नोव्हेंबरपर्यंत सादर करावी, असे निर्देश देत सुनावणी 21 नोव्हेंबरपर्यत तहकुब करण्यात आली. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे.
या प्रकरणात शिवसेनेच्या आमदारांच्या एकूण 34 याचिकांचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. आज झालेल्या या सुनावणीला ठाकरे गटाचे अनिल देसाई, सुनिल प्रभू आणि अजय चौधरी उपस्थित आहेत. तर शिंदे गटाचे कुणीही उपस्थित नव्हते.
शिंदे गटाच्या 16 आमदारांना ई मेलच्या माध्यमातून व्हिप बजावण्यात आला होता, असा दावा ठाकरे गटाने केला. त्या संबंधित त्यांनी पुरावेही सादर केले. पण ज्यावर व्हिप पाठवण्यात आले होते ते ई मेल आपले नसल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला.
आपल्याला व्हिपच मिळाला नाही. त्यामुळे त्याचे उल्लंघन केले असे होत नाही, असा दावा शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला. जर आम्ही व्हीप पाठवलेला ईमेल चुकीचा आहे तर बरोबर कुठला आहे ते त्यांनी सांगावे. आयटी कायद्यानुसार ईमेल हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.
शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांना स्पेशल ईमेल आयडी मिळाला आहे का? महेश शिंदे यांनी maheshshinde0003 असा मेल आयडी दिला. हा कुठला आयडी आहे? तुम्ही म्हणता ईमेल दिला आहे. पण ते म्हणतात तसं चुकीच्या ईमेलला जर दिला असेल तर त्याला उत्तर काय असा सवाल राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या वकिलांना दिला.
त्यावर ठाकरे गटाकडून युक्तिवाद करताना सांगितले की, जर आम्ही व्हिप पाठवलेला ईमेल चुकीचा आहे तर बरोबर कुठला आहे ते त्यांनी सांगावे. या प्रकरणात नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाही. गेल्या सुनावणीत आपण अर्ज दाखल केला होता.
जे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहेत. त्याला माझा विरोध नाही. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सुनावणी घ्यावी, असा युक्तीवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला.