हडपसर – मांजरी बु. येथील मुळा-मुठा नदीवरील पुलावरून एकटा आमदार प्रवास करणार नाही तर परिसरातील नागरिक दररोज ये-जा करणार आहेत, किमान त्यांचा विचार करून तरी शिंदे गट-फडणवीस (भाजप) सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत करीत राजकीय अडवणुकीवरून खोचक टिकाही केली.
मांजरी बुद्रुक, केशवनगर येथील प्रमुख जिल्हा मार्ग 56 आणि प्रमुख जिल्हा मार्ग 34 या रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही गावे पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. नागरी वस्ती अधिक असलेल्या या गावांमध्ये वाहतुकही वाढली आहे.
मांजरी बुद्रुक येथे मुळा-मुठा नदीवरील पूल अर्धवट बांधण्यात आल्याने वाहन चालकांची गैरसोय सहन करावी लागते आहे. यासाठी आवश्यक असलेला निधी तत्काळ देण्यात यावा याकडे आमदार चेतन तुपे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 25 कोटी निधी या पुलाच्या कामासाठी मंत्री महोदयांकडे प्रस्तावित आहे. मात्र, अद्यापही जैसे थे स्थिती असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी सहन करावी लागत आहे.
विरोधी बाकावरील आमदार म्हणून याभागातील विकास कामांसाठी निधी कमी दिला जात आहे. ज्यामुळे येथील रस्ते आणि पूल अर्धवट स्थितीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ राजकारण केले जावून नागरिकांना त्यांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यापासून हे सरकार त्यांना वेठीस धरत आहे. – चेतन तुपे, आमदार, हडपसर विधानसभा