पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – तेल कंपनीच्या पाइपलाइनमधील अडथळा ओळखण्याच्या स्मार्ट उपकरणांसाठी एमआयटी विश्वशांती विद्यापीठास पेटंट मिळाले आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी बनवलेल्या स्मार्ट इनलइन इन्स्पेक्शन टूल (सिली) उपकरणांमुळे तेल कंपन्यांचे हजारो डॉलर्स वाचणार आहेत.
या उपकरणासाठी पृथ्वीराज पाटील, स्लाविन मस्करेन्हास, विराज जिवाणे, अश्वजीत पवार, दीपक कुमार यादव आणि रिया हुद्दार ह्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विघ्नेश शेणॉय, संकेत शिंदे आणि स्नेहल कोळेकर या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे.
यासंदर्भात विद्यार्थी पाटील म्हणाला, तेल पाइपलाइनमधून वाहत असताना त्यात अनेक वेळा मेणासारखा थर जमा होतात आणि त्यामुळे तेल प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो आणि कंपन्यांचे नुकसान होते. तसेच हा थर काढण्यासाठी यंत्रांचा वापर करण्यात येतो. त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. तसेच नक्की कोठे हा थर जमा झाला आहे हे समजत नसल्यामुळे संपूर्ण पाइपलाइन साफ करावी लागते.
अंदाजे एका विशिष्ट लांबीच्या पाइपसाठी जवळपास ५० हजार डॉलर्स एवढा खर्च येतो. या प्रक्रियेमध्ये तेवढ्या कालावधीसाठी काही प्रक्रिया बंद ठेवाव्या लागतात. “सिली’ हे उपकरण पाइपमध्ये जमलेल्या मेणाच्या जाडीबद्दल रिअल-टाइममध्ये माहिती प्रदान करते. ह्या साठी हे आयओटी आधारित यंत्र विविध सेन्सर्स वापरते, अशी माहिती प्राध्यापकांनी दिली.