नायगाव (पुणे) – पुरंदर तालुक्यातील आंतराष्ट्रीय विमानतळासाठी रिसे गावाचे नाव पुढे आल्याने येथील ग्रामस्थांनी विरोधाचा ठराव करून त्याच्या प्रति जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्या आहेत. तर मंगळवारी (दि. 1) मोजणीसाठी ड्रोन सर्व्हेचे अधिकारी विमानतळाच्या जमिनीच्या मोजणीसाठीच आले आहे, असे समजून ग्रामस्थांनी त्यांना पिटाळून लावले.
पुरंदर तालुक्यात होत असलेल्या विमानतळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे नुकतीच बैठक पार पडली होती. त्या बैठकीमध्ये पुरंदर हवेलीचे लोकप्रतिनिधी संजय जगताप यांनी नियोजित विमानतळाच्या जागेत बदल करून पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, पांडेश्वर या गावांच्या परिसरात विमानतळ करण्यास हरकत नाही असे म्हटले होते.
त्यांनतर मंगळवारी सर्व्हे ऑफ इंडियाचे अधिकारी सर्व्हे करण्यासाठी रिसे या भागात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी आलेल्या अधिकाऱ्यांना सर्व्हे करू दिला नाही.
आमच्या गावात सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा सर्व्हे नको आहे, असे ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले त्यावेळी ग्रामस्थ काहीही ऐकण्याची मनस्थितीत नसल्याने त्यांना सर्व्हे न करताच माघारी परतावे लागले.
रिसे गावात मोजणीसाठी आलेले अधिकारी हे सर्व्हे ऑफ इंडियाचे होते. ते ड्रोन सर्व्हे अचूकता पाहण्यासाठी आले होते. या सर्व्हेचा व विमानतळाचा कोणताही संबंध नाही. तरी नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे.
– विकास गोफणे, उपअधीक्षक भूमी अभिलेख, पुरंदर