पुणे – राज्यात करोना पार्श्वभूमीवर यंदा 5 सप्टेंबर रोजी “शिक्षण दिन’ साजरा होणार नाही. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने “थॅंक अ टिचर’ हे विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने ऑनलाइन विविध उपक्रम, स्पर्धा घेण्यात येणार आहे.
“शाळा बंद शिक्षण सुरु’ या उपक्रमाच्या यशोगाथांचे सादरीकरण केंद्र, तालुका, जिल्हास्तरावर होणार आहे. दुर्गम व शहरी भागांतील शिक्षकांसोबत काही स्वयंसेवक, शिक्षक मित्र शिक्षण देण्याचे काम स्वयंस्फूर्तीने करीत आहेत. अशा व्यक्तींचे वेबिनार तालुका, जिल्ह्यात आयोजित करण्याचे नियोजन करावे लागणार आहे. यात शाळा व्यवस्थापन समिती व पालकांना सहभागी करून घ्यावे लागणार आहे.
विद्यार्थी, पालक यांच्यासाठी विविध ऑनलाइन विषय देऊन वक्तृत्व, निबंध, पोस्टर, घोषवाक्य, कविता, प्रेरणा, प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन, अभिवाचन स्पर्धा घ्याव्या लागणार आहेत. शिक्षक व अधिकाऱ्यांनी शिक्षण देण्याव्यतिरिक्त कोविड योद्धा म्हणून विविध कामे केली आहेत. यात तपासणी करणे, बाहेरून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करणे, विलिगीकरण कक्षात निरीक्षक म्हणून व इतर या कामांचे अनुभव करून कामांचे कौतुकही करता येणार आहे.
शैक्षणिक रांगोळी, चित्रकला, सुभोभन स्पर्धा आयोजन करणे, शिक्षणाच्या प्रयोगशील शाळांचे सादरीकरण करणे, शिक्षक असलेले पण आता उच्च पदावर असलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे, स्वत: व्हिडीओ तयार करून पाठविणे आवश्यक आहे. या विविध उपक्रमांचे आयोजन करीत असताना “माझे प्रेरक शिक्षक’ या विषयाला प्राधान्य देण्यात यावे. 5 ते 10 सप्टेंबर या कालावधीत उपक्रम घेण्यात यावेत, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले.