जेरूसलेम – भारताची अभिनेत्री आणि मॉडेल हरनाझ संधू 2021 ची विश्वसुंदरी ठरली. इस्रायलमधील आयलेट येथे झालेल्या स्पर्धेत तिने 70 वी विश्वसुंदरी होण्याचा सन्मान पटकावला. देशासाठी हा अभिमनाचा क्षण आहे. कारण, या चंदिगढमधील मॉडेलने हा किताब 21 वर्षांनी भारताला मिळवून दिला. पेरुग्वेच्या नादिया फेरेइरा आणि द. आफ्रिकेच्या ललेला मॅसवन यांना नमवून तिने हे यश संपादित केले.
फेरेइरा आणि मॅसवन यांच्यासह हरनाझने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या अंतिम फेरीत तिला प्रश्न विचारला होता. आज सामोरे जात असलेल्या दबावाला तोंड देण्याबाबत तरुण महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल? या प्रश्नावर हरनाझने अतिशय प्रभावित करणारे उत्तर दिले. “मला वाटते आजच्या तरुणाईला आत्मविश्वासाच्या दबावाला सर्वाधिक सामोरे जावे लागते. तुम्ही समजावून घ्या, तुम्ही युनिक आहात आणि तेच तुम्हाला सुंदर बनवते, तुम्ही तुमची तुलना इतरांशी करणे सोडा आणि आता जगात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांविषयी चर्चा करा. मला वाटतं तुम्ही हे समजावून घेण्याची गरज आहे. खुले व्हा, तुमच्यासाठी बोला, कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हीच तुमच्या आयुष्याचा आवाज आहात. माझ्यात आत्मविश्वास आहे आणि म्हणूनच मी येथे उभी आहे. धन्यवाद” असे ती म्हणाली.
यापूर्वी अभिनेत्री लारा दत्ता हिने हा किताब 2000 मध्ये जिंकला होता. दुसऱ्या स्थानावर फेरेइरा आणि तिसऱ्या स्थानावर मॅसवन यांनी आपला हक्क सांगितला. हे देदीप्यमान यश मिळवणाऱ्या या हरनाझच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिले आहे, सारं विश्व तुमचं असल्यासारखं चमकत रहा…
मिस दिवा युनिव्हर्स 2021 जिंकून विश्वसुंदरी होण्याचा प्रवास हरनाझने सुरू केला होता. लहान वयातच मॉडेल बनलेल्या हरनाझचा सौंदर्य स्पर्धेचा प्रवास 2017 मध्ये मिस चंदिगढ बनल्यानंतर सुरू झाला होता.
विश्वसुंदरी स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या प्रवासात तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती अमृतसरच्या सुवर्णमंदिरात दर्शन घेत असल्याचे चित्रण आहे. त्यावर लिहिले होते ही स्पर्धा मी जिंकली आहे. ती म्हणते, श्रद्धा दिसत नाही. ती जाणवते. माझ्या मनात आज हीच भावना आहे. तुम्ही माझ्यावर वर्षाव करत असलेल्या आशीर्वादावर, देवावर आणि माझ्या कुटुंबीयांवर माझी श्रद्धा आहे.
या प्रवासाची मी मजा घेत आहे. या सुंदर स्पर्धेच्या अखेरीकडे प्रवास करताना मी या अनुभवाचा पुन्हा प्रत्यय माझे कुटुंब आणि माझ्या पंजाबसह मला घ्यायचा आहे. या दीड महिन्यात मला आलेल्या अनुभवासाठी आणि तुमच्या प्रत्येकासाठी मी कृतज्ञ आहे. विजेती व्हायला मी सज्ज आहे. आपण सर्व मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत भेटू, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले होते.
पंजाबी कुटुंबातील असणाऱ्या हरनाझने विश्वसुंदरी बनण्यासाठी आईकडून प्रेरणा घेतल्याचे सांगितले. ती म्हणाली, पिढ्यान्पिढ्या असणारी पितृसत्ताक पद्धती मोडून ती (आई) स्त्रीरोगतज्ज्ञ बनली आणि आमच्या कुटुंबीयांचे नेतृत्व केले.
आपल्या कुटुंबीयांशी अत्यंत जवळीक सांभाळणारी हरनाझ महिलांना आपल्या पद्धतीने मदत करत असते. आपल्या आईसोबत महिलांच्या आरोग्य शिबिरात महिलांचे आरोग्य आणि मासिक धर्माच्या आरोग्या संदर्भात मार्गदर्शन करत असे. आपल्या आईच्या संघर्षाने प्रभावित झालेली हरनाझ आज महिलांच्या प्रश्नावर विशेषत: सबलीकरण, शिक्षणाचा घटनात्मक हक्क आणि निवडीचे स्वातंत्र्य यांचा जोरदार पुरस्कार करते, असे तिच्या बायोत नमूद केले आहे.
अभिनेत्री असणाऱ्या हरनाझने अभिनेत्री आणि मिसवर्ल्ड 2000ची विजेती प्रियंका चोप्राकडून प्रेरणा घेतली आहे. आपला फावला वेळ मित्रांच्या रमणाऱ्या हरनाझला योगा, नृत्य आणि स्वयंपाकाची आवड आहे.