राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल

नरेंद्र मोदी यांच्यावर टीका : कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांची ठिकठिकाणी प्रचारसभा

पुणे – अपयशी माणूस राष्ट्रीय भावना निर्माण करतो हा जगाचा इतिहास आहे. पंतप्रधान मोदींचे तसेच झाले आहे. गेल्या पाच वर्षांत वाढलेली बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढलेली गरिबी आणि महागाई, कामगार, आदिवासी समाजाचे प्रश्‍न आणि आरक्षणाबद्दल मोदी काहीच बोलत नाहीत. हे मुद्दे सोडून राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली ते लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या या भूलथापांना न भूलता पुणे लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांचे उमेदवार मोहन जोशी यांना प्रचंड मताने निवडून आणणे हाच मोदी यांना धडा असेल, असे मत कॉंग्रेसचे नेते प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले.

पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, मित्रपक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित टिंगरे नगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रकाश म्हस्के, ऍड. अभय छाजेड, पुणे लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, सुषमा अंधारे आदी यावेळी उपस्थित होते.

जे समाजाचे प्रबोधन करतात त्यांचे जीव मोदी सरकारच्या काळात धोक्‍यात आले आहेत. लोकशाही, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्ष राज्य हे हे संविधानात आहे. दुर्दैवाने 2013 पासून राजकारणाला नवीन दिशा द्यायला सुरूवात झाली आहे. मोदींना पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी जनतेच्या मनात उत्सुकता निर्माण केली गेली. मात्र, त्यावेळी राम मंदिर, समान नागरी कायदा, 370 वे कलम याबाबत जी आश्‍वासने दिली होती ती कुठे गेली? छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक होणार होते त्याचे काय झाले?, असे सवाल गायकवाड यांनी उपस्थित केले.

पर्वती विधानसभा मतदार संघात प्रचार फेरी
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-रिपब्लिकन पीपल्स आघाडी आणि मित्र पक्ष आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी पर्वती विधानसभा मतदार संघात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, शशिकला कुंभार, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
याशिवाय जोशी यांच्या प्रचारार्थ मंडई, शुक्रवार पेठ, सदाशिव पेठेत संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.
महात्मा फुले मंडईतील मंदिरात शारदा-गजाननाची आरती करून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आण्णा थोरात, डॉ. सतीश देसाई, रोहित टिळक, रवींद्र माळवदकर, गटनेते अरविंद शिंदे, सदानंद शेट्टी, रवींद्र धंगेकर, अजित दरेकर आदी नगरसेवक, संजय बालगुडे, बाळासाहेब दाभेकर, विरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, शिरीष मावळे, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा कमल व्यवहारे, नीता रजपूत, प्रवीण करपे, विनायक हणमगर आदी उपस्थित होते.

शारदा गजाननाचे दर्शन घेतल्यावर मंडईतील कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तेथून अखिल टिळक रोड मंडळापासून अशोक विद्यालय येथे संवाद यात्रेची सांगता झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.