मुट्टलवाडीत पाणी टंचाईचे तीव्र सावट

ढेबेवाडी – मुट्टलवाडी (कात्रे-जाधववस्ती), ता. पाटण येथील पाण्याचे स्रोत आटल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तरी प्रशासनाने त्वरित पाण्याचे टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

याठिकाणी ग्रामस्थांना ग्रॉव्हिटीद्वारे तसेच एक विहीर व खासगी कुपनलिकेद्वारे पाणीपुरवठा होत होता. मात्र, डोंगरातील पाणीसाठा आटल्याने ग्रॉव्हिटीद्वारे होणारा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. विहिरीनी तळ गाठला आहे. त्यामुळे कुपनलिका वगळता इतर स्त्रोत आटल्याने ग्रामस्थांना कुपनलिकेवर अवलंबून राहवे लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या दिवसातून कशा तरी दोन घागरी मुश्‍किलीने मिळत आहेत. तर खर्चासाठी लागणार पाणी अर्धा किलोमीटरवर असलेल्या बंधाऱ्यातून आणावे लागत आहे. त्यामुळे भर उन्हात नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

याठिकाणी सुमारे 80 पाळीव जनावरे व अडीचशे कुटुंब वास्तव्यास आहेत. या सर्वांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. खर्चाचे व जनावरांसाठी लागणारे पाणी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बंधाऱ्यामधून आणावे लागत आहे. त्या बंधाऱ्यातील पाणी देखील आटत चालले आहे. बंधाऱ्याने तळ केव्हाच गाठला आहे. त्यामुळे काही दिवसातच पाण्याची देखील समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील लोकांवर स्थलांतरीत होण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. तरी संबंधितांनी याठिकाणी भेट देऊन पाण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.