शिवसेना तालुकाप्रमुख गणेश जामदार यांचा आरोप
सविंदणे-शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे पार पडलेल्या शिरुर तालुकास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेमध्ये वजन गटामध्ये परस्पर फेरबदल करण्यात आला आहे. या गैरप्रकाराची चौकशी करून 32 किलो गटाची पारदर्शक फेरचाचणी घेण्यात यावी, अशी मागणी शिरुरचे शिवसेना तालुकाप्रमुख गणेश जामदार यांनी निवेदनाद्वारे शिरूर तालुका व जिल्हा कुस्तीगीर संघाकडे केली आहे.
दि. 12 रोजी शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा या ठिकाणी तालुकास्तरीय निवड चाचणीच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जामदार यांचा मुलगा यश जामदार यांचे 32 किलो वजन गटामध्ये नाव नोंदवीले होते. त्याचे वजन 31 किलो 900 ग्रॅम भरले होते. स्वत: अध्यक्षांनी ते वजन घेतले होते. त्या गटामध्ये एकूण तीन स्पर्धकांचे नाव नोंदविले होते. यामध्ये यशचे वजन 32 किलो वजन गटामध्ये असताना देखील 35 किलो ग्रॅम वजन गटामध्ये जाणीवपूर्वक का खेळवण्यात आले? त्याकरिता त्याकामी पंच कमिटीमधील अथवा पदाधिकाऱ्यांमधील किंवा अन्य कोणाच्या सांगण्यावरून हा अन्याय करण्यात आला, याचा खुलासा करुन मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जामदार यांनी केली आहे.
निवडचाचणीबाबत अशा तक्रारी कायम येत होत्या. वारंवार गैरसमजूतीतून झाले असे वाटत होते. परंतु आज स्वत:हा प्रकार माझ्या मुलाबरोबर घडल्याने त्याचे गांभीर्य लक्षात येत आहे. पंचकमिटी व पदाधिकाऱ्यांकडून नेहमी पारदर्शक कारभाराची मुलांच्या, मल्लांच्या पालकांची अपेक्षा असते. त्यामुळे कोणावर अन्याय न होता योग्य ती दिशा मिळते. परंतु घडलेला प्रकार हा गंभीर आहे. तालुका कुस्तीगीर संघाच्या प्रतिमेला काळीमा फासणारी आहे.
संबंधीतांवर योग्य कारवाई करावी व 32 किलो गटाची पारदर्शक फेरचाचणी घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेना तालुुकाप्रमुख गणेश जामदार यांनी तालुका व जिल्हा कुस्तीगीर संघाकडे निवेदनाद्वारे केली आहे.