कोरेगाव भीमा परिसरात पोलिसांची कारवाई
शिक्रापूर- शिक्रापूर परिसरातील कोणत्याही व्हॉट्सऍप ग्रुपवर कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट आली आणि ती पोलिसांच्या निदर्शनास आली तर अशा प्रत्येक ग्रुप ऍडमिनवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिक्रापूर व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 250 हून अधिक व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनला त्याबाबत लेखी नोटिसा पोलिसांकडून देण्यात आल्या असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर व शिवशांत खोसे यांनी दिली आहे.
एक जानेवारो रोजी कोरगाव भीमा, पेरणे फाटा येथे होणाऱ्या मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस सतर्क झाले आहे. व्हॉट्सऍप ग्रुपवरून कोणत्याही पोस्ट पसरून त्याने काही परिणाम होऊ नये म्हणून या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
या नोटिसा गुन्हा शाबिती करणासाठी न्यायालयात पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहेत. यात व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनला थेट तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेपर्यंत नेण्याची पूर्ण तयारी जिल्हा पोलिसांनी केली आहे. यावर्षीच्या 1 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादनदिनाच्या वीस दिवस आधीच 280 जणांवर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईबरोबरच पोलिसांनी आता सोशल मीडियाकडे आपला मोर्चा वळविला आहे. याच पार्श्वभूमीवर इन्स्टाग्राम, टिकटॉक, हॅलो ऍप आदींसह फेसबुक व्हॉट्सऍपच्या राज्यातील सर्व सोशल मीडिया ग्रुपवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 150 ग्रुप व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 100 ग्रुप ऍडमिनला वैयक्तिकरीत्या नोटिसा बजावण्यात आली आहे.
- आरोपींना तीन वर्षे शिक्षा होणार
बजावण्यात आलेल्या नोटिशीनुसार, हद्दीतील कुठल्याही व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनसह ग्रुपमधील सभासदांपैकी कुणीही समाजविघातक, ऐतिहासिक विपर्यासाची, सामाजिक भडकावू टीकाटिप्पणी पोस्ट केल्यास, मेसेजेस किंवा इमेज अथवा व्हिडिओ शेअर केल्यास सर्वप्रथम ग्रुप ऍडमिनला अटक करून त्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. आत्ता दिलेली नोटीस ही पुरावा म्हणून न्यायालयात वापरून आरोपींना कमाल तीन वर्षांपर्यंत कोठडीच्या शिक्षेपर्यंत नेण्याची पूर्ण तयारी आम्ही केली असल्याचे देखील बंदोबस्त नियोजन विभागाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांनी सांगितले आहे.