मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे नाव देशभर गाजत असल्याचं दिसून येत आहे. धीरेंद्र शास्त्री हे सतत चर्चेत असतात. कुणाच्याही मनातलं ओळखण्याची अनोखी सिद्धी या बाबांना अवगत असल्याची चर्चा आहे. त्यावरुन त्यांना अनेकांनी आव्हान देखील दिले आहे. आणि याच कारणांमुळे धीरेंद्र शास्त्री नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी देशभरातून लोक येत असतात.
दरम्यान, आता पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांचे नाव चर्चेत आलं आहे. आणि त्याच कारण देखील तितकंच खास आहे. आपल्या कडे येणाऱ्या भाविकांचं मन वाचन करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर आता सिनेमा येणार आहे. दिग्दर्शक अभय प्रताप सिंह यांनी याबद्दल घोषणा केली आहे.
सिनेमा विषयी बोलताना अभय प्रताप सिंह म्हणाले की, “बागेश्वर धाम’ या सिनेमात बागेश्वर धामचे धार्मिक महत्त्व तसेच मानवतावादी आणि सामाजिक कार्य यासर्व गोष्टींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या सिनेमाचं नाव नोंदणीकृत केलं आहे. एपीएस पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होणार आहे’.
तसेच, या महिन्यातच सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, अद्याप तरी सिनेमातील कलाकारांची नावे समोर आलेली नाहीत. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये सिनेमाचं शूटिंग होणार आहे. ‘बागेश्वर धाम’ हा सिनेमा यावर्षातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सर्वांनाच या सिनेमाबद्दल उत्सुकता लागली आहे.