Ajit Pawar : अजित पवारांसह इतर नेत्यांनी केलेल्या बंडानंतर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते दिलीप वळसे पाटील शरद पवार यांना भेटण्यासाठी मोदीबाग येथे दाखल झाले आहेत. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सध्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटात आहेत.
शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणुन दिलीप वळसे पाटील यांची राजकारणात ओळख आहे. परंतु आज अचानक त्यांनी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काल राष्ट्रवादी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली. तर दुसरीकडे आज मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
परंतु ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने संपुर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतो. पण, पक्षात फुट पडल्यानंतर सर्वजण एकत्रित येणार का असा सवाल निर्माण झाला होता. अशातच आज दिलीप वळसे पाटील शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची भेट राजकीय नसल्याचे म्हंटले जात आहे. परंतु या भेटीनंतर अनेक तर्क -वितर्क लावले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकींच्या निकालानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील मोठ्या ग्रामपंचायती शरद पवार गटाने जिंकल्या होत्या. यावरूनही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.