देहूगाव – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 372 व्या वैकुंठगमन बीजोत्सव “तुकाराम बीज’ सोहळा बुधवारी (दि. 11) भक्तीमय वातावरणात झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी, वैष्णव बांधवांनी रणरणत्या उन्हात तुकोबांना अभिवादन केले. गोपाळपूरा येथील वैकुंठगमन मंदिरासमोर दुपारी बारा वाजता भाविक नतमस्तक झाले. नांदुरकीच्या वृक्षावर बुक्का व तुळशी-पानफुले उधळण करीत हा सोहळा पहायला मिळाल्याने “जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त केली.
जगद्गुरू श्री संत तुकोबारायांची कर्मभूमी असलेल्या देहूनगरीत दाखल झालेल्या दिंड्याच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा- टाळ-मृदंग यांच्या साथीत भजन कीर्तन व हरिनामाच्या जयघोषाने सुरू होता. यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी बुधवारी पहाटे चार वाजल्या पासूनच पांडूरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरात आणि गोपाळपूरा येथील वैकुंठगमण मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
सकाळी आठ वाजल्यापासून वैकुंठगमण मंदिराच्या परिसरात भरणाऱ्या वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी गोपाळपुऱ्याकडे गर्दी करीत होते. जागा मिळेल तेथून हा सोहळा दृष्टीस पडेल, अशा ठिकाणी सुरक्षित बसून राहिले होते. रात्री व पहाटे हवेत गारवा असला तरीही सकाळी दहा वाजल्यानंतर मात्र उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवू लागला होता. अशा उन्हातही भाविकांच्या मुखी हरिनाम व अंत:करणात भगवंताला अभिवादन करण्याची ओढ चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. उन्हामुळे वाहणाऱ्या घामाच्या धारांची ते पर्वा न करता तुकोबारायांचे दर्शनासाठी मिळेल त्या वाहनाने वेगाने देहूकडे येत होते. श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमाला पहाटे तीन वाजल्यापासून काकड आरतीने सुरुवात झाली.
संस्थानच्या वतीने मंदिराच्या गाभाऱ्यात, मंडपात, प्रवेशद्वारात आणि गोपाळपूरा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर आणि नांदुरकीच्या झाडाखालील पारावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यानंतर महापूजेनंतर भाविकांना मुख्य मंदिरात, शिळामंदिर व वैकुंठगमण मंदिरात दर्शनाला सोडण्यात आले. सकाळी मंदिरातील सर्व विधीवत पूजा अटोपल्यानंतर सकाळी साडे दहाच्या सुमारास पालखीचे मानकरी तानाजी कळमकर, प्रकाश टिळेकर, विजय टिळेकर, कृष्णा पवार, लक्ष्मण पवार, गुंडाजी कांबळे, नामदेव भिंगारदिवे यांनी चोपदार नामदेव गिराम यांच्या सुचनेनंतर पालखी “पुंडलिका वरदे हरि विठ्ठल’ नामाचा जयघोष करीत वारकऱ्यांसह शिंगाडे, सनई, चौघडा व ताशाच्या गजरात साडेदहा वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिरातून गोपाळपुऱ्याकडे रवाना झाली.
पालखी पुढे परंपरेप्रमाणे संबळ, गोंधळी बापू भांडे, चौघडा बाळू पांडे शिंगवाले, पोपट तांबे, रियाझ मुलाणी यांनी ताशा, अब्दागिरी नवनाथ रणदिवे व रमेश लोहकर, अजित सोनवणे यांनी गरूडटक्के, कडूबा सोनवणे यांनी छत्री, हनुमान यादव व विठ्ठल रणदिले यांनी पताका, तर जरीपटका महादेव वाघमारे यांनी यांनी आपल्या खांद्यावर घेतल्या होत्या. पालखी पुढे मानकरी कल्याणचे आप्पा महाराज लेले, दिडींचे चालक प्रवीण महाराज लेले यांच्या दिंडीसह मोठ्या लवाजम्यासह पालखीचे मुख्यमंदिरातून वैकुंठगमण मंदिराकडे प्रस्थान झाले. पालखी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वैकुंठगमण मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालून येथील नांदुरकीच्या झाडाखाली आली.
मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे परतली. त्याच वेळी उपस्थित भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्य मंदिरात दर्शनबारी मंडपातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांच्या हस्ते वैकुंठगमन मंदिरातील संत तुकाराम महाराज मंदिरात आरती करण्यात आली. या वेळी निवासी नायब तहसीलदार अरूण आटोळे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, मंडल अधिकारी गणेश सोमवंशी, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर, तलाठी अतुल गीते, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, सहायक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण, प्रसाद गज्जेवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे, जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यानंतर पालखी वैकुंठगमण मंदिरामधून पुन्हा देऊळवाड्यात आल्यानंतर देऊळवाड्यात पालखी विसावली.
सायंकाळी मुख्य मंदिरात 5 ते 7 शिरवळकर फडाचे तेथे कीर्तन झाले. याच वेळी फरताळे दिंडी शिळामंदिरापुढे असते. सायंकाळी 7 ते 9 वाजता राममंदिरापुढे देहूकर महाराज फडाचे कीर्तन होते. वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांच्या मार्गदर्शनात वाहनावर नियंत्रण ठेवण्यात आले होते. वाहनाच्या देहूत प्रवेश बंदी करण्यात आली होती. सोहळ्यास पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे आणि सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या उपस्थित कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विश्वस्तांच्या हस्ते महापूजा
संस्थानचे माजी विश्वस्त विश्वजीत महाराज मोरे यांच्या हस्ते काकडारती झाली. काकडारतीनंतर देवस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे व विश्वस्त संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. शिळा मंदिरात विश्वस्त संजय महाराज मोरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. वैकुंठगमण मंदिरातील श्री संत तुकाराम महाराजांची महापूजा विश्वस्त माणिक महाराज मोरे व विशाल महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.