संगमनेर – संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा परिसरात बिबट्याने पाच जणांवर हल्ला केला. त्यात एक महिला जबर जखमी झाल. हा प्रकार मंगळवारी (दि.10) रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.
संगमनेर तालुक्यातील पठारभागातील आंबीखालसा गावाशेजारील पुलाजवळून दीपक ढमढेरे हे मोटारसायकलवर जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. परंतु ढमढेरे बालंबाल बचावले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच दादा मनोहर ढमढेरे हे दूध घेऊन डेअरीकडे चालले असताना त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला.
सुदैवाने तेही बचावले. अर्ध्या तासाने माधव यमा काळे (रा. पळशी, वनकुटे) हे लता माधव काळे व सोनाली गांडाळ यांच्यासह त्यांच्या मोटरसायकलवरून आंबीखालसा येथे जात होते. ते पुलाजवळ येताच बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात सोनाली गांडाळ यांच्या डाव्या हाताला जखमा झाल्या, तर बिबट्याला पाहून लता काळे या जागेवरच बेशुद्ध झाल्या.
यावेळी काळे व गांडाळ यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. आरडाओरड ऐकून परिसरातील ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावले. त्यानंतर जखमी गांडाळ यांना घारगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यांना संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती समजतात वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.