पुणे – पित्याच्या कष्टाचे “त्याने’ केले “सार्थक’

रिक्षाचालकाचा मुलगा होणार लष्करी अधिकारी

पुणे – वडील कोल्हापूरमध्ये रिक्षाचालक, तर आई गृहिणी होती. आपल्या मुलाने चांगल्या शाळेत जावे, चांगले शिकावे, मोठे व्हावे अशी या पालकांची इच्छा होती. ती सार्थक याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात्र करून पूर्ण करून दाखविली. पुढील लष्करी प्रशिक्षणासाठी तो डेहराडून येथील “इंडियन मिलिटरी ऍकॅडमी’ येथे रुजू होणार आहे.

सार्थक याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्याचवेळी एका अपघातात आईचे निधन झाले. कुटुंबावर शोककळा पसरली होती. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सार्थक धवन याने न केवळ आपले प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण केले, तर चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले. आपल्या या प्रवासाबाबत सांगताना सार्थक आणि त्याचे कुटुंबीय भावनिक झाले होते.

सार्थक याचे वडील शशिकांत धवन हे विद्यार्थ्यांना घरातून घेऊन शाळेत सोडणे आणि परत शाळेतून घरी सोडण्याचे काम करतात. गेली तीस वर्षे ते रिक्षाचालक म्हणून काम करत आहेत. मात्र, आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनावे हे स्वप्न त्यांनी कायमच पाहिले आहे. ते सार्थक याने पूर्ण केले आहे.

सार्थकचे दहावीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथील सेंट झेव्हियर्स शाळेत झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण औरंगाबाद येथील येथील सर्व्हिस प्रिपरेटरी स्कूल येथून पूर्ण केले. त्यानंतर त्याने “एनडीए’मध्ये प्रवेश घेतला.

मी “एनडीए’तून उत्तीर्ण होणे, ही माझ्या आईला दिलेली श्रद्धांजली आहे. आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर घरातील एक प्रेमळ व्यक्तीच्या जाण्याने भावनिक पोकळी निर्माण झाली होती. मात्र, या काळात वडील आणि भाऊ माझ्या मागे भक्कमपणे उभे राहिले. अशा प्रतिकूल परिस्थितीही त्यांनी मला “एनडीए’त जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी आज येथे आहे. प्रबोधिनीत आल्यावर खऱ्या अर्थाने नवीन आयुष्याची सुरुवात झाली होती. एका साध्या मुलाचे एक जबाबदार व्यक्तीमध्ये रूपांतर करण्याचे काम या संस्थेने केले आहे.
– सार्थक धवन, “एनडीए’चे प्रशिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)