मुंबई – मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ल्याची धमकी फोन करणाऱ्याने दिली आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँड लाईनवर काल रात्री 10 वाजता हा फोन आला होता. या धमकीच्या फोनंतर एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. त्यादृष्टीने आता पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.
मात्र हा फोन नेमका कोणी केला आणि धमकी देण्याचा उद्देश काय होता? याचा आता पोलिस तपास करणार आहे. याशिवाय पोलिस हा कॉल ट्रेस करत असून लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे. तसेच तपासात कांदिवली येथून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देखील समोर आहे. त्याअनुषंगाने पोलिस पुढील तपास करणार आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून वारंवार धमकीचे असे फोन येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा फोन
याआधी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आज धमकीचा फोन आला होता. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली होती. फोनवरील व्यक्तीने ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याचा दावा केला होता. मात्र, पोलिसांनी फोन करणाऱ्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या एका महिला अधिकाऱ्याला धमकीचा फोन कंट्रोल रूममध्ये आला होता. महिला अधिकाऱ्याने कॉलरला विचारले की तो कोण आहे, त्याला त्याने प्रतिसाद दिला नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महिला अधिकाऱ्याने कोणत्या ट्रेनमध्ये बॉम्ब आहे असे विचारले असता त्या व्यक्तीने कॉल डिस्कनेक्ट केला. त्याला पुन्हा फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने आपला नंबर बंद केला होता.