लातूर – लातूर जिल्ह्यातील हासोरी भागात आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. या घटनेने परिसरातील नागरिक भयभीत झाले. आज सोमवारी सकाळी साडेसहा वाजता निलंगा तालुक्यातील हासोरी या गावात जमिनीतून गूढ आवाज होऊन भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्याने घरावरील पत्रे थरथरल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
या धक्क्याची तीव्रता 2.8 रिस्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. सकाळी साडेसहा वाजता झालेल्या धक्यानंतर पुन्हा सकाळीच साडेदहा आणि पावणेअकरा वाजताच्या सुमारासही दोन धक्के बसले.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंपाच्या घटनेला काल तीस वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर आज पुन्हा धक्का बसल्याने नागरिक भयभीत झाले. गेल्या वर्षी 2022 मध्येही लातूर जिल्ह्यात एकूण सहा वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते.