थेऊर फाटा येथील घटना : कारचालक घटनास्थळावरून पसार
लोणी काळभोर, दि.12 (वार्ताहर) -मद्यपान करून चारचाकी चालवणाऱ्या चालकाने भरधाव वेगाने येवून पुढे चाललेल्या दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरून घरी परतत असलेले मुलगा व आई गंभीर जखमी झाले असल्याची घटना थेऊरफाटा (ता. हवेली) येथील रेल्वे उड्डाणपुलावर घडली आहे. हा अपघात (दि. 10) सायंकाळी घडला आहे. अपघातात गौरव रोहिदास कंद (वय 24) व त्यांची आई उषा रोहिदास कंद (वय 47, दोघेही रा. गणेशवाडी, थेऊर, ता. हवेली) हे जखमी झाले आहेत.
गौरव कंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्विफ्ट कारचालक संतोष गायकवाड (रा. पेठ, ता. हवेली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव कंद हे आपली दुचाकीवरून आपल्या आईला घेऊन घरी गणेशवाडी येथे चालले होते. ते थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपूल उतरत असताना मागून स्विफ्ट ही भरधाव वेगाने आली. तिने दुचाकीला जोरदार धडक दिली.
दुचाकीवरील आई व मुलगा रस्त्यावर पडले. गौरव यांचे कंबर, उजवा पाय, गुडघा, नढगी व घोट्यावर तर त्यांची आई ऊषा यांचे उजव्या खांद्यावर व कमरेवर जखमा झाल्या. अपघात झाल्याचे निदर्शनास येताच मद्यपान केलेला स्विफ्ट कारचालक संतोष गायकवाड हा तेथे न थांबता सरळ निघून गेला. तेथे जमलेल्या लोकांनी दोघांना तात्काळ पुढील उपचारासाठी कवडीपाट येथील शिवम रूग्णालयात दाखल केले आहे.