125 गुन्ह्यांमध्ये 40 जणांना अटक
नव्या अत्याचारविरोधी कायद्यात या गुन्ह्याचाही करणार समावेश
मुंबई : महिला अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी राज्यात करण्यात येणाऱ्या नवीन कायद्याअंतर्गत लहान मुलांच्या अश्लील व लैंगिक अत्याचाराच्या अश्लिल क्लिप सोशल मिडियावर व्हायरल करण्यासंदर्भातील गुन्ह्यांचाही (चाईल्ड पोर्नोग्राफी) समावेश करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत केली.
चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधील कारवाईमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर असून आतापर्यंत 125 गुन्ह्यांमध्ये 40 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
चाईल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. देशमुख म्हणाले, चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाई करण्यासाठी “नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरो’ने (एनसीआरबी) प्रत्येक राज्यात नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली असून राज्यात महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाई करण्यासाठी राज्यभरात ‘ऑपरेशन ब्लॅक फेस’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत 40 जणांना अटक करण्यात आली असून देशभरात अशा स्वरूपाच्या करवाईमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन (एनसीएमईसी- युएसए) ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था समाजमाध्यमांवरील अश्लील व बाललैंगिक अत्याचाराच्या चित्रफीती आदींची (पोर्नोग्राफिक व्हिडीओ) माहिती फेसबुक, इन्स्टाग्राम आदी ‘इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर’ (ईएसपी) यांच्या सहकार्याने एनसीआरबीला पुरविते.
एनसीआरबी ही माहिती संबंधित राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना कारवाईकरिता पुरविते. आतापर्यंत चाईल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात राज्यात 125 गुन्हे दाखल करण्यात आले असून 40 आरोपींना अटक करण्यात आली. भा.दं.वि. कलम 292 सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या (पोक्सो क्ट) कलम 14, 15 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 अ आणि 67 ब अन्वये ही अटक करण्यात आली आहे.