Pune Big Crime | पु्ण्यात गरिब मुलांना पैशाचे अमिष दाखवून ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’, दिड वर्षात तब्बल 4500 व्हिडीओ अपलोड

दररोज सहा लिंक इंटरनेवर अपलोड; मुसक्‍या आवळण्यासाठी पोलिसांकडून जय्यत तयारी

पुणे – सांस्कृतिक राजधानी असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या पुणे जिल्ह्यातून लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या दररोज सहा ते सात व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

गेल्या दीड वर्षात असे साडे चार हजार व्हिडिओ अपलोड झाल्याचे केंद्र सरकारच्या गृहखात्याने पुणे पोलिसांना कळवले. त्यामुळे पुणे पोलिसांचे धाबे दणानले असून या सर्व समाजकंटकांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. यात काही प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्‍यता आहे. यातील 845 लिंकची माहिती पुणे पोलिसांनी शोधून काढली आहे.

पुणे पोलिसांनी ही मोहीम तीव्र केली आहे. त्यात असे प्रकार हे लपून छपून चालत असल्याने आणि त्यासाठी गरीब घरातील मुलांना पैशाचे आणि पोटभर जेवणाचे आमिष दाखवून त्यांचा वापर केला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशी तक्रार देण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीच्या मुळापर्यंत जाणे कठीण होते. समाजातील या विकृतांवर आता समजाने पोलीस बनून लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने चाईल्ड पोर्नोग्राफीवर देशात बंदी घातली. मात्र, तरीही विविध वेबसाईटवर चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ अपलोड होत आहेत. यावर केंद्र सरकार लक्ष ठेवत असते. या लिंक ज्या शहरातून अपलोड होतात, त्या राज्य सरकारला याची माहिती दिली जाते. यानंतर संबंधित राज्य सरकारकडून स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली जाते. पोलीस लिंक अपलोड करणाऱ्याला शोधून काढून त्याच्यावर कारवाई करतात.

पुणे शहर पोलिसांनी यासंदर्भातील कार्यवाही

पोलीस उपायुक्‍त (सायबर व आर्थिग गुन्हे) भाग्यश्री नवटके आणि पोलीस निरीक्षक डी. एस. हाके करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपयी ऍड्रेस व इतर माहिती काढून डाऊनलोड करणाऱ्या व्यक्‍तींचा माग काढत आहेत. या माहितीच्या आधारे पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांना बहुतांश लिंकची माहिती कार्यवाहीसाठी देण्यात आली आहे.

पुणे पोलीस अशा प्रकारच्या लिंक डीलिट करते किंवा ती अपलोड व शेअर करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करते. पुणे पोलिसांनी 2020 मध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात आठ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये व्हिडिओ अपलोड करणे व शेअर करणाऱ्यांचा समावेश होता. यातील आरोपींवर माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी ऍक्‍ट) व शारीरिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण(पॉक्‍सो) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

केंद्र सरकारने 10 जुलै 2019 रोजी पॉक्‍सो कायदा संमत केला आहे. यानूसार चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ शेअर, अपलोड आणि स्वत:च्या ताब्यात ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन शिक्षा होऊ शकते. यामुळे नागरिकांनी इंटरनेटवर असे व्हिडिओ अपलोड किंवा शेअर करू नयेत.

  • डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक, सायबर सेल

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.