पुणे – म्हाडामधील पदांच्या भरती प्रक्रियेतील परीक्षा घेण्याची जबाबदारी ज्या कंपनीवर सोपवली होती त्या कंपनीचा मालकच प्रश्नपत्रिका फोडण्यात सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पुणे पोलिसांनी या टोळीतील सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. आरोग्य विभागाच्या पेपर फुटीचा तपास सुरू असताना त्या टोळीचाच या पेपरफुटी प्रकरणात असणारा सहभाग समोर आला आहे. आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील तीन आरोपींना या गुन्ह्यात वर्ग करुन घेण्यात आले.
आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणातील आरोपींकडून म्हाडाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणार असल्याचे धागेदोरे मिळाले होते. त्याच आधारे कौशल्याने तपास करत हे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले.
संतोष हरकळ, अंकुश हरकळ (दोघे रा. बुलढाणा), प्रीतेश देशमुख (पुणे), अजय चव्हाण, कृष्णा चव्हाण आणि अंकित चनखोरे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडे पोलिसांनी रात्रभर चौकशी केली. रविवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली. शिवाजीनगर न्यायालयात त्यांना हजर केले असता 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हरकळ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात एजंट आहे तर देशमुख म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रश्नपत्रिका तयार करणारा अधिकारी आहे.
पोलिसांनी आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात एकूण 17 आरोपींना अटक केली होती. त्यामधे टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव आणि अंकित चनखोरे यांचा समावेश होता. त्यांच्या अंगझडतीमध्ये म्हाडाच्या परिक्षेस बसणाऱ्या तीन परिक्षार्थींची प्रवेश पत्रे, मूळ शैक्षणीक पात्रतेची प्रमाणपत्रे, कोरे धनादेश सापडले होते. यामुळे पोलिसांना या आरोपींचा म्हाडाच्या परीक्षेशी काही तरी संबंध असल्याचा संशय आला होता. त्यामुळे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्यांना शनिवारी रात्री एका कारमधून ताब्यात घेतले. त्यावेळी कारमध्ये प्रीतीश देशमुख होता. प्रितीश देशमुख हा म्हाडाच्या लेखी परिक्षा घेण्यात येणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आहे. त्याच्या झडतीमध्ये लॅपटॉपमध्ये म्हाडाच्या लेखी परिक्षेचे पेपर सापडले. तसेच त्याच्याकडे असलेल्या पेन ड्राईव्हमध्येही पेपर आणि अन्य कागदपत्रे सापडली. या तीघांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, मीनल पाटील आणि उपनिरीक्षक अनिल डफळ यांनी केली.
या गुन्हयाचा तपास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करीत आहेत.
“लष्कर, आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुट प्रकरणी खासगी क्लास चालकांचा मोठा हात आहे. त्यांनी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पेपर देण्याचा प्रयत्न केला आहे. पेपर फुटी प्रकरणातील टोळ्या औरंगाबादवरुन सक्रीय असल्याचे पुढे आले आहे. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात गोपनियतेचा भंग झाला आहे. तातडीने कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला.”
-अमिताभ गुप्ता, (पोलीस आयुक्त)