पुणे- पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेमधील शिवाजीनगर ते स्वारगेट हा 6 किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी 3 टनेल बोरिंग मशिन वापरण्यात येत आहे. आतापर्यंत 7 किमीचा भुयारी मार्ग केला असून, 2 टनेल बोरिंग मशिनच्या सहाय्याने कृषी महाविद्यालय येथून भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. तर 1 टनेल बोरिंग मशिन स्वारगेट येथून मंडईच्या दिशेने येत आहे.
गुरूवारी कृषी महाविद्यालय येथून टनेल बोरिंग मशिन बुधवार पेठ येथे पोहोचले (ब्रेक थ्रू) आहे. कृषी महाविद्यालय येथून 29 नोव्हेंबर रोजी पहिले टनेल बोरिंग मशिन “मुठा’ आणि 30 नोव्हेंबर रोजी दुसरे टनेल बोरिंग मशिन “मुळा’चे काम सुरू झाले. सिव्हील कोर्ट स्थानक पार करून मुठा नदीखालून बुधवार पेठ येथे “मुठा’ टनेल बोरिंग मशीन पोहचत आहे. दुसरे टनेल बोरिंग मशीन “मुळा’ लवकरच बुधवार पेठ स्थानकात पोहचणार आहे. यावेळी महामेट्रोचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये उपस्थित होते. नागरिकांच्या सहभागामुळे महामेट्रोने हा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
भूमिगत मेट्रो मार्ग असणारे पुणे हे चौथे शहर
भूमिगत मेट्रो मार्ग नदीखालून जात असणारे पुणे हे भारतातील चौथे शहर आहे. यापूर्वी मुंबई (मिठी नदी), कलकत्ता (हुगळी नदी) आणि चेन्नई (कुम आणि अद्यार) या महानगरांमध्ये टनेल बोरिंग मशीनने भूमिगत मेट्रोसाठी नदीच्या खालून बोगदा तयार केला आहे. मुठा नदीच्या खालून जाणारा बोगदा सुमारे 33 मीटर खोल असून, नदी पात्राच्या तळापासून साधारणपणे 10 मीटर खालून जात आहे. पुणे मेट्रोचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.