पुणे – ‘कोवॅक्सीन’ लसीचा पहिला डोस घेतला. परंतु, मोबाइलवर आलेल्या मेसेजमध्ये आणि प्रमाणपत्रावर “कोविशील्ड’ लस घेतल्याचा मेसेज येत असल्याच्या तक्रारी अनेक लाभार्थ्यांकडून केल्या जात आहेत. मात्र, ही ऍपमधील तांत्रिक “एरर’ असून, पहिला डोस ज्या लसीचा घेतला, त्याच लसीचा दुसरा डोस मिळणार आहे, त्यामुळे लाभार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, असे लसीकरण केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात एका ज्येष्ठ महिलेने “कोवॅक्सीन’ लसीचा डोस घेतला. त्यासाठी कोविन पोर्टलवरून नोंदणीची प्रक्रियाही पूर्ण केली होती. मात्र,लसीकरणानंतर मोबाइलवर आलेल्या मेसेजमध्ये “कोविशील्ड’चा पहिला डोस देण्यात आल्याचा उल्लेख दिसून आला.
सर्वांना डोस मिळतील…
लाभार्थ्यांना जी लस देण्यात येईल, त्याची योग्य नोंद लसीकरण केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी “कोविन पोर्टल’वर करावी. माहिती भरताना कोठे टीक करायचे याबाबत योग्य ती काळजी घेतली तर लाभार्थ्यांना योग्य मेसेज जाईल. शिवाय “कोविन पोर्टल’वर नोंदणी करून लसीकरणासाठी “अपॉइंटमेंट’ घेतल्यानंतरही “तुमचे नियोजित लसीकरण रद्द झाले आहे’ असा मेसेज येत असल्याच्या लाभार्थ्यांच्या तक्रारी गुरूवारीही कायम होत्या.
“कोवॅक्सीन’ लसीसाठी लसीकरण केंद्रांची नव्याने नोंदणी करताना, त्या केंद्रांवरील नियोजित “अपॉइंटमेंट’ रद्द झाल्या आहेत. मात्र, लसीकरण प्रक्रियेतील “परिस्थितीजन्य’ बदलांमुळे असे प्रकार घडत असून, सर्वांना लसींचे डोस मिळतील, असे राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.