पुणे – करोनाच्या प्रादुर्भाव अद्यापही कायम असूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा दि. 21 मार्च रोजी होत आहे. या परीक्षेला सामोरे जात असताना ज्या उमेदवारांना करोनाची लक्षणे दिसून येत असल्यास, त्यांना पीपीई कीट उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा दि. 14 मार्च रोजी होणार होती. मात्र राज्य शासनाने करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुण्यासह राज्यभरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांनी रस्त्यावर उतरत ही परीक्षा वेळेत घेण्यासाठी आंदोलन केले. त्याची दखल घेत राज्य सरकारने ही परीक्षा दि. 21 मार्च रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
त्यानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येत्या रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी मानक कार्यप्रमाणाली (एसओपी) आज प्रसिद्ध केली. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना किमान तीन पदरी कापड्याचा (मास्क) परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा वापर करणे उमेदवारांना अनिवार्य राहील.
परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता तसेच आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. करोनाचे लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना आगाऊ कळवावे. अशा उमेदवारांना मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शू कव्हर, मेडिकल कॅप इत्यादी बाबी समाविष्ट असलेले पीपीई कीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.