मंचर (प्रतिनिधी) – हिंदू नववर्ष गुढीपाडवा या निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखड व सर्व सलग्न संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या हिंदू नववर्ष शोभा यात्रेचे आयोजन मंचर तालुका आंबेगाव येथे करण्यात आले होते. या शोभा यात्रेस सुमारे २५ हजार हिंदू बांधव आणि भगिनींची उपस्थित होती.
मंचर येथील श्रीराम मंदिर येथून शोभा यात्रेला सुरुवात झाली. श्रीराम मंदिरात भाजपचे नेते संजय थोरात, माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. त्यानंतर परंपरेनुसार ध्वज पूजन, शस्त्र पूजा करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रभागी धर्मध्वज त्यामागे घोडे, उंट सहभागी झाले होते.
त्यावर विराजमान छत्रपती श्री शिवाजी महाराज, मावळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. हिंदू धर्मात सर्वात आधी पूजेचा मान असणाऱ्या श्री गणरायाचा चित्ररथ, भगवान शंकराचा नंदीवर विराजमान चित्ररथ होते तर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मूर्ती आणि संविधान चित्ररथ बालवानर सेना, बजरंग बलीची पूर्णाकृती मूर्ती, धर्मवीर चंद्रशेखर आण्णाचा स्मृतिरथ विशेष लक्षणीय होता.
त्याचबरोबर केदारनाथ मंदिराचा देखावा, योगी शंकराची भव्य मूर्ती त्यावर केलेले विद्युत रोषणाई आणि त्या मूर्ती समोरून नृत्य करत सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरले. या शोभायात्रेत ठिकठिकाणी रौद्र शंभो मर्दानी खेळ विकास मंचाच्या कार्यकर्त्यांनी मर्दानी खेळ सादर केले. यावर्षी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले मार्गावर उभे केलेली सुमारे ४० फुट उंचीचा केदारनाथ मंदिराचा देखावा आकर्षणाचा विषय ठरला.
नारायणगाव येथील वाजगे आणि पाटे आळीची ढोलताशा पथक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. या सांगता सभेचे प्रमुख मार्गदर्शक विश्व हिंदू परिषद केंद्रीय मठ मंदिर अर्चक पुरोहित अरुण नेटके, डॉ. सुरेश चव्हाण उपस्थित होते. सुमारे १०० मुली पारंपारिक नऊवारी साडी परिधान करून शोभा यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
रस्त्यावर काढली रांगोळी….
शोभायात्रेत राज्यश्री भागवत यांनी संपूर्ण शोभायात्रेच्या मार्गावर हाताने रांगोळी काढली. यावेळी प स्वामी भारतानंद सरस्वतींजी, जिल्हा मंत्री संतोष खामकर, जिल्हा अध्यक्ष प्रशांत काळे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख गणेश राऊत, जिल्हा सहसंयोजिका मातृशक्ती मनीषा चासकर, प्रखंड अध्यक्ष गणेश गाडे, प्रखंड मंत्री अक्षय जगदाळे, प्रखंड संयोजक सागर भोर हे उपस्थित होते.
या शोभायात्रेचे नियोजन पार्थ चासकर, बाबू देठे, ऋषिकेश सोमवंशी, रोहन बिडकर, मयूर गायकवाड, साई गुंजाळ, किरण चव्हाण, निशांत गवारी, प्रतीक बाणखेले, यश काळे, आदेश एरंडे, अक्षय कानसकर, नवनाथ गुंजाळ, अनिकेत काळे, सार्थक म्हस्के, अक्षय चिखले, चिन्मय महाजन यांनी केले. हेमंत लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले.