पुणे – ज्येष्ठ नागरिकाच्या घरात केअर टेकर म्हणून राहून तेथेच दरोडा टाकणारा अट्टल गुन्हेगार संदीप भगवान हांडे व त्याच्या टोळीवर चतुःशृंगी पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. ही घटना (दि. 3 मार्च 21) रोजी वृंदावन सेक्टर सी, वृंदावन हौसिंग सोसायटी, पंचवटी, पाषाण येथे घडली.
आरोपींनी ज्येष्ठ दाम्पत्याच्या घरातील कामगाराच्या पायावर काठीने व कोयत्याने मारून जखमी केले होते. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व कामगारांच्या हात व तोंडाला कापडाने बांधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम यासह एकूण 15 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला.
या गुन्ह्यात संदीप भगवान हांडे (वय 25), किशोर कल्याण चनघटे, (21), भारत बद्रीनाथ चनघटे (21, तिघे रा. पिंपरखेडा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (25), मंगेश बंडू गुंडे (वय 20, रा. वडीकाळ्या, ता. अंबड, जि. जालना), विक्रम दीपक थापा ऊर्फ बिके (वय 19, रा. विनयनगर, इंदिरानगर, नाशिक) यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन मोटार सायकल, सोने-हिऱ्याचे दागिने, कॅमेरा असा एकूण 21 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.