शहरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

रावेत बंधाऱ्यात पाण्याची पातळी कमी झाल्याने समस्या

पिंपरी – शहरातील प्रमुख भागांमध्ये बुधवारी (दि. 24) कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. रावेत बंधाऱ्यात पाण्याची पातळी कमी झाली होती. पर्यायाने, पहाटे काही वेळ पंपिंग बंद ठेवावे लागल्याने ही परिस्थिती उद्‌भवली.

पिंपरी, चिंचवड, बिजलीनगर, दापोडी, पिंपळेगुरव, नेहरूनगर, खराळवाडी, संत तुकारामनगर या भागात प्रामुख्याने ही अडचण जाणवली. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे पाण्याची गरज आणि मागणी जास्त आहे. दुसरीकडे महापालिकेकडून आठवडाभरातून एक दिवस भागनिहाय पाणी कपात करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्यास त्याचा परिणाम लगेचच जाणवतो.

पाणी पुरवठ्याबाबत सह-शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले की, रावेत बंधारा येथे पाणी पातळी कमी होती. त्यामुळे पहाटे काही वेळ पंपिंग बंद ठेवावे लागले. पवना धरणातून कमी पाणी सोडण्यात येत आहे का, याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली. त्यांनी पुरेसे पाणी सोडले जात असल्याचे सांगितले. रावेत बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी होऊ नये, यासाठी आम्ही पाटबंधारे विभागाच्या संपर्कात आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.