वैद्यकीय महाविद्यालयावर शिक्‍कामोर्तब

मुख्यसभेची मंजुरी : सात वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने तरतूद

पुणे – पुणेकरांना स्वस्तात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने ट्रस्ट स्थापन करून महापालिका महाविद्यालय सुरू करणार आहे. या प्रस्तावाला बुधवारी महापालिका मुख्यसभेने मंजुरी दिली. यासाठी 622 कोटी रुपये खर्च करणार आहे. यासाठीच्या ट्रस्टमध्ये सर्वपक्षीय गटनेत्यांचा समावेश, यातील सदस्य वाढवणे आणि कमी करण्याचे अधिकार मुख्यसभेला द्यावेत, या कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्या उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

पुण्यात सर्व सेवा-सुविधा उपलब्ध असणारे वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. भाजपची सत्ता आल्यानंतर या प्रकल्पाला माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करून चालना दिली. एका सल्लागार कंपनीकडून या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी तीन पर्यायांपैकी वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन करून महाविद्यालय सुरू करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालय चालवण्याची जबाबदारी ट्रस्टची असेल. ट्रस्टचे काम हे स्वतंत्र असणार असून, अहमदाबाद महापालिकेने असे महाविद्यालय सुरू केले आहे. येथील अभ्यासक्रम आणि प्रवेश शुल्क महाविद्यालय ठरवणार आहे. महाविद्यालयासाठी खर्च आणि औषधोपचार या रकमेतून भरून काढण्यात येणार आहे. बांधकामासाठी येणारा खर्च महापालिका सात वर्षांमध्ये अंदाजपत्रकामध्ये तरतूद उपलब्ध करून देणार आहे.

महाविद्यालयासाठी 595 पदांची निर्मिती आणि भरती ट्रस्टच्या माध्यमातून होईल. यामुळे महाविद्यालय चालवण्यासाठी कोणताही आर्थिक बोजा महापालिकेला सहन करावा लागणार नाही.

अशी असेल ट्रस्टची रचना
वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्टचे विश्‍वस्त पुण्याचे महापौर, तर स्थायी समिती अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य अधिकारी (सचिव), अधिष्ठाता वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय (खजिनदार), सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते सदस्य असतील. ट्रस्टमध्ये एक उच्चस्तरीय समिती असेल. यात महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य अधिकारी, अधिष्ठाता आणि रुग्णालयाचे अधीक्षक असतील. या कमिटीचे सदस्य सचिव अतिरिक्त आयुक्त असतील.

शहरातील आरोग्यसेवेच्या दृष्टीने चांगला सक्षम पर्याय उभा राहावा, शिक्षणाचे मोठे दालन उभे राहावे, यासाठी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ही संकल्पना स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून अर्थसंकल्प सादर करताना मांडली. आज खऱ्या अर्थाने ऐतिहासिक निर्णय महापालिकेच्या माध्यमातून झाला. शहरासाठी भविष्यकाळातील दूरगामी, एक आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने उभी राहणार आहे.
– मुरलीधर मोहोळ, माजी अध्यक्ष, स्थायी समिती

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.