आंबळे येथे आढळली महाकाय मगर

कराड – पाटण तालुक्‍यातील तारळे विभागात असलेल्या आंबळे येथे तारळी नदीपात्रात सुमारे 8 फूट लांबीच्या आढळून आलेल्या महाकाय मगरीस वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्‍यू मोहीम राबवत ताब्यात घेतल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, मंगळवार, दि. 27 रोजी मौजे आंबळे, ता. पाटण येथे तारळी नदीमध्ये काही युवक रात्री खेकडे पकडण्यास गेले होते. त्यावेळी त्यांना नदीशेजारी डबक्‍यात मगर दिसली. याची माहिती सूरज शिंदे व प्रशांत भांदिर्गे यांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना रात्री 11 वाजता दिली. ही माहिती समजताच 500 ते 600 लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

भाटे यांनी वनक्षेत्रपाल डॉ. अजित साजणे व विलास काळे यांना ही माहिती दिली. त्यानंतर तिघांनीही घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी एक तासात मगर ताब्यात घेतली. 8 फूट लांबीची ही मगर मादी असून तिचे वजन 75 किलो आहे. वनविभागाच्या वराडे येथील नर्सरीमध्ये मगरीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. या मोहिमेत वनपाल कुंभार, आर. जी. कदम, अरविंद जाधव, जयवंत कवर, सुरेश सुतार यांनी भाग घेतला होता.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पाण्यातील मगरी पाण्याच्या प्रवाहाचे विरुध्द दिशेने मार्गक्रमण करीत असतात. पाटण तालुक्‍यात मगरी आढळून येण्याची ही दुर्मिळ घटना असून पूरस्थितीमुळे ही मगर कृष्णानदी पात्रातून तारळी नदीचे पात्रात आली असावी.
विलास काळे, वनक्षेत्रपाल, पाटण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)