काश्‍मीर भारताचा भाग होणार नाही- एमडीएमके अध्यक्ष वैको यांची मुक्तफळे

चेन्नई – काश्‍मीरबाबतचे 370 कलम रद्द करून केंद्र सरकारने भारताला धोक्‍यात आणले आहे, अशा शब्दात एमडीएमके पक्षाचे सरचिटणीस वैको यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. एवढेच नव्हे तर देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी होतानाही जम्मू काश्‍मीर हा भारताचा भाग होणार नाही, अशी मुक्‍ताफळे उधळली आहेत.

वैको हे त्यांच्या आगाऊ वक्‍तव्यांबद्दल कुप्रसिद्ध आहेत. यापूर्वीही त्यांनी काही मुद्दयांवर अशाच प्रकारे आगाऊ वक्‍तव्ये केली होती. जम्मू काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्याबद्दल चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले होते. त्याबद्दल पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी आजचे विचित्र वक्‍तव्य केले आहे.

देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी जरी साजरी झाली तरी काश्‍मीर भारताचा भाग होणार नाही. भाजप शासित केंद्र सरकारने देशाला अडचणीतच आणले आहे, असे वैको म्हणाले. काश्‍मीरच्या मुद्दयावरून आपल्यावर 30 टक्के कॉंग्रेसकडून आणि 70 टक्के भाजपकडून टीका झाल्याचेही त्यांनी सांगितले.

वैको हे अलिकडेच तामिळनाडूमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. काश्‍मीर फेररचना विधेयकाला त्यांनी राज्यसभेमध्ये विरोध केला होता. काश्‍मीरचा विषय हाताळण्यात अपयश आल्याबद्दल त्यांनी कॉंग्रेसवरही जोरदार टीका केली होती. 370 कलम रद्द केल्यास काश्‍मीरचे कोसोवो, दक्षिण सुदान आणि पूर्व तिमूर होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्‍त केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)