भोर – तालुक्यातील रांजे गावात रांजे ग्रामपंचायत आणि भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिलाफलक उद्घाटन, अमृत रोपवाटिकेअंतर्गत 75 देशी झाडांची लागवड, माजी सैनिकांचा सत्कार, पंचप्राण शपथ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय धनवटे, सरपंच सुप्रिया जायकर, भारती विद्यापीठ एनएसएस कार्यक्रम अधिकारी डाॅ. अमोल कदम, अभिजीत कांबळे, कोमल कोंडे, प्रशांत यादव, तुलसीहार पाटील, अविनाश काटे उपस्थित होते. हवेलीचे आमदार भीमराव तापकीर यांनीही कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमादरम्यान, महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी 75 देशी झाडांची लागवड केली. माजी सैनिक पिसाळ यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक भूषण पुरोहित यांनी केले. अभिजीत कोंडे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाकरीता प्राचार्या डॉ. विदुला सोहोनी यांचे मार्गदर्शन लाभले.