पुणे – महापौर आरोग्य विशेष अर्थसहाय्य योजना कुचकामी

अपुऱ्या निधीमुळे कोणीही फिरकेना : लाभार्थींना दिली जातेय तुुटपुंजी मदत

पुणे – अपुऱ्या निधीमुळे महापौर आरोग्य विशेष अर्थसहाय्य योजनेकडे कोणी फिरकेचना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या रोगांवर रोजचाच खर्च सुमारे 20 ते 30 हजारांच्या घरात जातो, त्या रोगांवर अतिशय तुटपुंजी रक्कम या अर्थसहाय्य योजनेतून दिली जाते. त्यामुळे अनेकजण अन्य योजनांचा लाभ घेताना दिसतात.

महापौर निधी अंतर्गत आरोग्यासाठी विशेष अर्थसहाय्य योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्या अंतर्गत कर्करोग, हृदयविकारात बायपास करण्यासाठी, ऍन्जिओप्लास्टी, दृष्टीपटलदोष, किडणीरोपण या पाच रोगांवरील उपचारांसाठी अर्थसहाय्य केले जाते. यंदाच्या अर्थसंकल्पात या निधीसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मात्र, हे अर्थसहाय्य रोगाच्या इलाजखर्चापेक्षा अतिशय तुटपुंजे आहे. शिवाय महापालिकेकडून ज्या-ज्या आरोग्य योजनेंतर्गत आर्थिक मदत केली जाते, ती एका रुग्णाला एकच योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे रुग्ण महापौर आरोग्य विशेष योजनेपेक्षा आयुष्यमान भारत, महात्मा फुले आरोग्य योजना यांचा लाभ घेतात. कारण या योजनांमधून मिळणारा निधी जास्त रक्कमेचा आहे.

महापौर आरोग्य विशेष अर्थसहाय्य योजनेत कर्करोगग्रस्त रुग्णांच्या आर्थिक सहाय्यासाठी 75 लाख रुपयांची तरतूद केली आहे, त्यातून प्रत्येक पात्र रुग्णाला 50 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

हृदयविकारात बायपास करायची असल्यास प्रत्येक अर्जदाराला 30 हजार रुपये निधी मिळतो, यासाठीही 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ऍन्जिओप्लास्टीसाठी प्रत्येकी एकावेळीच 15 हजार रुपये अशी 85 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. दृष्टीपटल दोषासाठी वार्षिक तरतूद 15 लाख रुपये की आहे, त्यातून प्रत्येक रुग्णाला 35 हजार रुपये मिळू शकतात. किडणीरोपण सारख्या मोठ्या आजारातील मदतीची रक्कम केवळ 25 हजार रुपये प्रत्येकी ठेवण्यात आली आहे.

या उलट पूर्वीची राजीव गांधी नावाने असलेल्या योजना या सरकारात महात्मा फुले नावाने आणली आहे. या योजनेत सुमारे 70 रोगांवरील अर्थसहाय्याचा समावेश केला असून, त्यासाठी प्रत्येकी दीड लाख ते अडीच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. याशिवाय आयुष्यमान योजनेंतर्गत प्रत्येकी पाच लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच महापालिकेच्या शहरी-गरीब योजनेंतर्गत लगेचच एक लाख रुपयांपर्यंतचा धनादेश रुग्णालयाच्या नावे मिळतो.

ही रक्कम जास्त असल्याने साहजिकच या योजनेतील मदतीची अपेक्षा रुग्णांकडून केली जाते. एकावेळी, एका रुग्णाला एकाच योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे ज्या योजनेत आर्थिक मदत जास्त रक्कमेची आहे साहजिकच तिकडे ओढा जास्त असतो.

पूर्वी महापौर निधींतर्गत असलेल्या अर्थसहाय्यासाठी बरेच अर्ज येत होते. मात्र, चालू आर्थिक वर्षांत दोन महिन्यात एकही अर्ज या योजनेंतर्गत आला नसल्याचे प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समजते.

महापौर निधीअंतर्गत आरोग्यासाठी विशेष अर्थसहाय्य योजनेतील रक्कम अतिशय कमी आहे. त्यामुळे अन्य योजनांकडे रुग्ण वळतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर निधीची रक्कम वाढवण्यासंदर्भात महापौरांशी चर्चा करणार आहोत.
– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, मनपा.

Leave A Reply

Your email address will not be published.